26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयसध्या युद्धाचे युग नाही

सध्या युद्धाचे युग नाही

एकमत ऑनलाईन

पुतीन यांना सूचक इशारा, एससीओ परिषदेत दोन्ही नेत्यांत चर्चा
समरकंद : उझबेकिस्तानमधील समरकंद येथे शांघाय सहकार्य संघटना परिषदेत (एससीओ) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांत यूक्रेन युद्ध, दोन्ही देशांची मैत्री, परस्पर सहकार्य, अन्नसंकट या मुद्यांवर चर्चा झाली. मोदी आणि पुतीन यांची भेट सकारात्मक होती. भारत आणि रशियाचे संबंध पहिल्यापासून मजबूत आहेत, असे सांगत पुतीन यांनी मोदींना रशियाला येण्याचे निमंत्रण दिले, तर मोदी यांनी रशिया आणि भारताचे संबंध भविष्यात आणखी मजबूत होतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सध्या काही युद्धाचे युग नाही, असे सांगत मोदींनी पुतीन यांना सूचक इशारा दिला.

नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या द्विपक्षीय बैठकीत पुतीन यांनी यूक्रेन बरोबरचे युद्ध आणि भारताची भूमिका माहिती असल्याचे म्हटले. आम्हालादेखील हे सर्व लवकर संपले पाहिजे, असे वाटते. तिथे काय घडत आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू, असे पुतीन म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी त्यापूर्वी यूक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याचे म्हटले होते. कोरोना महामारी आणि यूक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगासमोर अन्न संकट निर्माण झाले आहे. यापुढे जाऊन ऊर्जा संकटदेखील निर्माण झाल्याचे मोदी म्हणाले. सध्याचे युग हे युद्धाचे नसल्याचे मोदी म्हणाले. आपल्याला चर्चेतून प्रश्न सोडवावे लागणार आहेत. लोकशाही कूटनिती व चर्चेने चालते यावर आपण अनेकदा फोनवरून चर्चा केली आहे. आपण सातत्याने एकमेकांच्या कल्याणासाठी काम करत आहोत. आज एससीओ परिषदेतही तुम्ही भारताप्रती जी भावना व्यक्त केली, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे, असे मोदी म्हणाले.

आंतरराष्ट्रीय संस्थांनी रशियावर यूक्रेन युद्धामुळे बंधने टाकली होती. तरीदेखील भारताने जुनी मैत्री कायम ठेवत कमी किमतीत खनिज तेल खरेदी केले होते. रशियासोबतचा व्यापार बंद करावा, यासाठी भारतावर पाश्चिमात्यदेश देखील दबाव टाकत होते. मात्र, भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाची परंपरा कायम ठेवत रशिया-यूक्रेन समस्या दोन्ही देशांनी शांततेच्या मार्गाने सोडवावी, अशी भूमिका घेतली होती.

२२ वर्षांपासून घट्ट मैत्री
पुतीन यांनी भारत आणि रशिया एकत्र येऊन काम करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी रशियाला यावे, असे निमंत्रण पुतीन यांनी दिले. नरेंद्र मोदींनी बैठकीत भारत आणि रशियाचे संबंध मजबूत झाल्याचे म्हटले. जगाला आपल्या मैत्रीविषयी माहिती आहे. आपली मैत्री २२ वर्षांपासून मजबूत होत आहे, असे ते म्हणाले.

शांततेच्या मार्गाने
पुढे जायला हवे
नरेंद्र मोदी यांनी भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री सातत्याने वृद्धिंगत होत आहे. आगामी काळात दोन्ही देशांचे संबंध आणखी मजबूत होणार आहेत. आपल्याला विविध प्रश्नांवर एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी शांततेच्या मार्गाने पुढे जावे, असे मोदी म्हणाले.

अन्न सुरक्षेसह ब-याच समस्या
आज संपूर्ण जग विशेषत: विकसनशील देशांपुढे अन्न सुरक्षा, इंधन सुरक्षा व खतांसारखी मोठी समस्या उभी आहे. आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या