नवी दिल्ली : सैन्यात भरतीसाठी जात आणि धर्माचे प्रमाणपत्र मागितल्याबद्दल भारतीय लष्कराच्या अधिका-याने स्पष्टीकरण दिले आहे. लष्करी अधिका-यांचे म्हणणे आहे की, अग्निपथ योजनेअंतर्गत लष्करी भरती प्रक्रियेत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. सैन्यात भरतीच्या वेळी जात, धर्म आदी प्रमाणपत्रांची मागणी केली जाते. यात नवीन काहीच नाही. लष्कराच्या या वक्तव्यानंतर भाजपने विरोधकांना चांगलेच घेरले आहे.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काही पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस आणि आप हे पक्ष वेळोवेळी भारतीय लष्करावर प्रश्न उपस्थित करताना दिसले आहेत. भारतीय लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी अग्निवीरमध्ये जात आणि धर्माचा उल्लेख करून जी भाषा वापरली आहे ती अस्वस्थ करणारी आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय सैन्य धर्माच्या वर
हे लोक जात आणि धर्माच्या आधारावर सैन्य भरतीचा आरोप करीत आहेत. याचे मला खूप वाईट वाटते. त्यांना सत्य माहीत नाही. सत्य हे आहे की, भारतीय सैन्यात धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर भरती होत नाही. भारतीय लष्कर जात आणि धर्माच्या वर आहे, असेही पात्रा म्हणाले. याआधी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की, १९४९ पासून सुरू असलेली व्यवस्था कायम आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही.