27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रखाते वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही; नागपुरात फडणवीसांचे वक्तव्य

खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही; नागपुरात फडणवीसांचे वक्तव्य

एकमत ऑनलाईन

नागपूर : अजून खाते वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर विमानतळावर बोलताना दिली.

१८ जुलै रोजीचे पावसाळी अधिवेशन राज्यातील सत्तांतरामुळे तसेच राष्ट्रपती निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तत्पूर्वी मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे प्रयत्न राहतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

लवकरच मंत्रिमंडळ स्थापन करू
राज्यात सध्या अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ लवकर स्थापन होऊन मदतीचे ठोस निर्णय होण्याची गरज आहे. सत्तेच्या खेळात सामान्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी खंत राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष अधिवेशनात बोलताना व्यक्त केली होती. याकडे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी लवकरच मंत्रिमंडळ स्थापन करू असे सांगितले.

आमच्या बाजूने निकाल लागणार
११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात शिंदे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. विदर्भाचा आम्ही यापूर्वीही विकास केला आहे. आताही अनुशेष दूर करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

स्वागत, ढोल-ताशे अन् जल्लोष

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वगृही नागपुरात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. नागपूर विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भातून त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते, पदाधिका-यांनी हजेरी लावली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला.

नागपूरकरांचे आभार
‘‘नागपूरकरांनी माझ्यावर प्रेम केले. आमदार म्हणून निवडून दिले. आज उपमुख्यमंत्री म्हणून आलो तेव्हा जोरदार स्वागत झाले. त्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्यावर मोठी जबाबदारी असून ती पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या