औरंगाबाद : राज्यातील राजकीय स्थिती आणि सध्याचे सरकार या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोठ विधान केले असून आपण मध्यावधी निवडणूक होतील असे म्हणालोच नव्हतो असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत दिले. मागील काही दिवसांपासून राज्यात मध्यावधी निवडणूक लागतील असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते.
शरद पवार म्हणाले की, पुढील निवडणुकीसाठी अडीच वर्षांचा कालावधी आहे. कोणतीही निवडणूक असली की, सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. त्या अनुशंगाने आपण पक्षातील नेत्यांना निवडणुकीसाठी तयारी लागण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, आपण मध्यावधी निवडणूक होईल असे म्हणालो नव्हतो, असेही पवारांनी सांगितले. शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल मोठे विधान केले आहे. शिवसेनेला झालेली मोठी हानी आणि सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे काय होणार असे प्रश्न उपस्थित झाले होते. त्यावर शरद पवार म्हणाले की पुढील काळात येणा-या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा आहे. मात्र हे निर्णय बसून चर्चेतून घ्यावा लागतील असेही त्यांनी नमूद केले.
बंडखोर आमदारांकडे ठोस कारण नाही
यावेळी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मुद्दावर पवार म्हणाले की, काही तरी कारण द्याव, म्हणून ते देत आहेत. शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडण्यासाठी कधी हिंदुत्वाचे तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे कारण दिले. शिवसेना सोडण्यासाठी त्यांच्याकडे ठोस कारण नसल्याचेही पवार यांनी नमूद केले.
औरंगाबाद नामांतराचा मुद्दा नव्हता
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्दावर पवारांनी भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा नव्हता असे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका केली.
न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास
उद्या ११ जुलै रोजी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या भवितव्यबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यावर शरद पवार म्हणाले की, आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.