27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलाडूचा प्रसाद मिळण्यास आणखी विलंब होणार

लाडूचा प्रसाद मिळण्यास आणखी विलंब होणार

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : मंदिर समितीच्या सावळ्या गोंधळामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लाखो भाविकांना विकत मिळत असलेला लाडू प्रसाद बंद आहे. आता टेंडर प्रक्रियेबाबत आक्षेप घेत एक संस्था न्यायालयात निघाल्याने अजूनही भक्तांना लाडू प्रसादासाठी वाटच पाहावी लागणार आहे. यापूर्वी अनेक महिने फक्त टेंडर उघडायला वेळ नसल्याने भाविकांना हा लाडूचा प्रसाद मिळत नव्हता. गुरुवार (१२ मे) मंदिर समितीच्या बैठकीत अखेर हे टेंडर उघडण्यास मुहूर्त मिळाला आणि ९ निविदाधारकांपैकी केवळ दोघांना यात पात्र केल्याने गेल्यावेळी ज्या संस्थेकडे टेंडर होते त्याने या प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे. आता ही संस्था न्यायालयात निघाल्याने भाविकांना मात्र आपल्या गावाकडे जाताना लाडूच्या प्रसादाशिवाय जावे लागणार आहे. यामुळे भाविक तीव्र संतापले असून आम्ही देवाच्या दर्शनानंतर घरी कोणता प्रसाद न्यायचा असा प्रश्न विचारत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून मंदिर समितीने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूची विक्री करण्यास सुरुवात केली होती. वारक-यांमध्ये हा लाडू प्रसाद खूपच लोकप्रिय झाल्याने वर्षभरात साधारण ५० ते ५५लाख लाडूंची विक्री होऊन समितीला यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत होते. कोरोना काळात हा लाडूचा प्रसाद समितीने बंद केला, मात्र यानंतर राज्यातील सर्व मंदिरे सुरू होताच सर्व मंदिरांत प्रसाद विक्री सुरू झाली होती. परंतु विठ्ठल मंदिरात लाडूच्या प्रसादाचे ई-टेंडर डिसेंबर २०२० मध्ये काढण्यात आले होते. याला काही संघटनांनी आक्षेप घेतल्यावर याचा अहवाल विधी व न्याय विभागाकडून मागवण्यात आला. हा अहवाल देखील प्राप्त झाला. काल हे टेंडर उघडण्यात आले मात्र जानेवारी २०१८पासून जे सुवर्ण क्रांती महिला बचत गट हे काम करत होते त्यांनाच अपात्र ठरवल्याने या संस्थेचे कायदेशीर सल्लागार दत्तात्रय फडतरे यांनी आता या प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

विठ्ठलाच्या लाडू प्रसादातून समितीला वर्षाला ५० ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. ही सदोष टेंडर प्रक्रिया राबवणा-या अधिका-याच्या पगारातून मंदिराचा झालेला तोटा वसूल करण्याची मागणी देखील न्यायालयात करणार असल्याचे अ‍ॅड. खडतर यांनी सांगितले. एक तर टेंडर वेळेत उघडले नाही आणि आता प्रक्रिया सदोष राबवल्याच्या आरोपाने पुन्हा विठ्ठलाचा लाडूचा प्रसाद लटकणार असून भाविकांनी मात्र मंदिर समितीच्या या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या