ऐकावे ते नवलच, १० दिवसांनंतर चोरी उघडकीस, २ अधिकारी निलंबित
पाटणा : कार, बस किंवा ट्रक चोरीच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र, आता चक्क रेल्वे पटरी चोरीचा प्रकार घडला आहे. तुम्ही म्हणाल रेल्वे पटरी मजबूत असते आणि ती सहजासहजी उखडता येत नाही. परंतु प्रत्यक्षात बिहारमध्ये चक्क २ कि.मी. लांबीची रेल्वे पटरी चोरून नेली आहे. दरम्यान, या प्रकरणी रेल्वेने तात्काळ कारवाई केली असून, दोन रेल्वे अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रेल्वे पटरी चोरून नेली जाते. परंतु याबद्दल तब्बल १० दिवस त्याचा थांगपत्ता लागत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बिहारमधील चोरट्यांनी आतापर्यंत रेल्वेचे इंजिन, मोबाईल टॉवर आणि रेल्वे इंजिनची चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. पण आता बिहारमधील चोरट्यांनी चक्क रेल्वे पटरी चोरण्याचा प्रताप केला आहे. एक दोन नव्हे तर १० दिवसांनंतर ही चोरी उजेडात आली. या प्रकरणी रेल्वेने २ अधिका-यांना निलंबित केले आहे. बिहारमधील समस्तीपूर रेल्वे डिव्हिजनअंतर्गत ही चोरी झाली.
बिहारमधील समस्तीपूर रेल्वे डिव्हिजनअंतर्गत चोरट्यांनी दोन किलोमीटर रेल्वेची पटरी चोरली. समस्तीपूर रेल्वे डिव्हिजनकडून टेंडर न काढता कोट्यवधी रुपयांचे स्क्रॅप विकले जात आहे. या प्रकरणात आरपीएफ अधिका-यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर रेल्वेने २ अधिका-यांना निलंबित केले आहे. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. रेल्वेला मिळालेल्या माहितीनुसार निलंबित करण्यात आलेले दोन्ही रेल्वे कर्मचा-यांची नावे श्रीनिवास आणि मुकेश कुमार सिंह अशी आहेत.
समस्तीपूर रेल्वे डिव्हिजनच्या माहितीनुसार लोहट चीनी मिलसाठी पंडोल रेल्वे स्टेशनपासून रेल्वे पटरी टाकण्यात आली आहे. चिनी मिल स्टेशन गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. स्टेशन बंद असल्याने तिकडे येणारी रेल्वे लाईनही बंद होती. त्यावरून कोणतीही रेल्वे धावत नव्हती. अशातच रेल्वेचे स्क्रॅप चुकीच्या पद्धतीने विकले जात असल्याचे समोर आले.. २४ जानेवारी रोजी हे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर रेल्वेने तातडीने कारवाई करत आरपीएफ अधिका-यसह दोन जणांना निलंबित केले. त्यासह याबाबत चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यासाठी एका कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळणा-यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
टेंडरशिवाय रेल्वे
स्क्रॅपची विक्री
रेल्वे डिव्हिजनच्या माहितीनुसार आरपीएफ अधिका-यांच्या परवानगीने टेंडरशिवाय रेल्वे स्क्रॅप विकले जात होते. यातील काही स्क्रॅप ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी दरभंगा आरपीएफ स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.