औरंगाबाद : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर करण्यात येत असलेल्या ईडीच्या कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर याच कारवाईवरून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या ७० वर्षांत कधीच असे झाले नाही, अशी खोचक टीका जलील यांनी केली आहे.
राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, आम्ही पहिल्यापासून सांगतोय संजय राऊत असू द्या की आणखी कुणी असू द्या, भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्तेमध्ये आली त्यांनी सर्वांत आधी देशातील सर्व तपास यंत्रणा आपल्या हातात घेण्याचे काम केले. गेल्या ७० वर्षांत कधीच असे झाले नाही. आपला राजकीय अंजेडा राबवण्यासाठी तपास यंत्रणाचा वापर केला जात आहे. आम्हाला माहीत आहे ईडीचा वापर सरकार करत आहे आणि त्याचाच दुरुपयोग केला जात असल्याच्या घटनेची आम्ही निंदा करत असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.
जलील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार…
औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या मुद्यावरून जलील मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याने, शिंदे यांच्या दौ-यात काळे झेंडे दाखवण्याची घोषणा जलील यांनी केली होती. मात्र त्यानंतर यावर बसून चर्चा करण्याचा प्रस्ताव जलील यांना मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यामुळे यावर जलील आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.