22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रदुस-या राज्यांबद्दल प्रेम असणा-यांनी खुशाल त्या राज्यात जाऊन राहावे

दुस-या राज्यांबद्दल प्रेम असणा-यांनी खुशाल त्या राज्यात जाऊन राहावे

एकमत ऑनलाईन

मुंबई : परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून या राज्यातील मराठी कष्टक-यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. दुस-या राज्यांबद्दल प्रेम असणा-या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन राहावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नाव न घेता सुनावले.

घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी अत्यंत जपून बोलण्याचा संकेत या देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करून हा टोला लगावला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते. गुजराती आणि राजस्थानी लोकांना वगळले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे राज्यपाल म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

राज्यपालांचे हे बोलणे अप्रस्तुत, राज्यपालांनी निर्विवाद राहावे- छगन भुजबळ
आदरणीय राज्यपाल हे आमचे मित्र पण त्यांनी असे वक्तव्य करणे शक्यतो टाळावे, यामुळे वाद वाढतात. राज्यपालांनी नेहमी निर्विवाद राहावे. ब्रिटिश असतील किंवा सगळ्यांनाच मुंबई आवडली होती. मुंबईत सर्व प्रकारचे लोक आहेत, अदानींना पण मुंबई आवडते. मुंबईला असलेले बंदर, व्यापार, उद्योग, विमानतळ अनेक कलाकार मुंबईतील. गुजराती, राजस्थानी सगळे आमचेच आहेत . देशाचे मुख्य न्यायाधीशही महाराष्ट्राचे. त्यामुळे मुंबईचे महत्त्व कसे कमी करता येईल ? मुंबादेवीचा आशीर्वाद आहे मुंबईवर. राज्यपालांचे हे बोलणे अप्रस्तुत असून राज्यपाल निर्विवाद असावेत.

महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या : रोहित पवार
वास्तविक सर्वांना सामावून घेण्याइतके समुद्रासारखे विशाल मन मुंबई व महाराष्ट्राचे आहे. याचा गैरफायदा घेत समुद्राच्या काठावर राहणा-या मोठ्या व्यक्तीकडून मराठी माणसाला कमी लेखण्याचा आणि भाषा व प्रांतवाद निर्माण करण्याचा होणारा प्रयत्न दुर्दैवी व महाराष्ट्राच्या भावना दुखावणारा आहे.

त्यांना त्यांची लायकी दाखवायची वेळ : जितेंद्र आव्हाड
राज्यपाल यांना महामहीम म्हटले जाते, त्यांना आदर दिला जातो, पण आता त्यांना त्यांची लायकी दाखवायची वेळ आली आहे, आज त्यांनी मराठी माणसाचा नाही तर मराठी माणसाच्या अस्मितेचा अपमान केला आहे.

कोणाचाही अपमान झालेला नाही : नितेश राणे
भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. राज्यपालांनी कोणाचाही अपमान केला नसून त्यांनी सत्य स्थिती सांगितली आहे.

राज्यापेक्षा भाजप सांभाळण्याची जबाबदारी राज्यपालांवर; अंधारेंची टीका
राज्यपाल हे राज्याचे पालक असतात अन् पालकाने राज्याप्रति पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन किंवा आकस बुद्धी न ठेवता ममत्ववाने राज्याचे संगोपन करणे, ही संविधानिक जबाबदारी आहे. परंतु, महामहीम राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून इतक्याही जास्त अपेक्षा ठेवू नयेत. कारण, राज्यापेक्षाही भाजप सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर अधिक आहे, अशी त्यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

तेजस्वी इतिहासाला नख लावू नका : भाजपा नेते आशिष शेलार
राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहिली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करू नये! असे शेलार यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज्यपालांनी वातावरण बिघडवणे दुर्दैवी : बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही राज्यपालांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. राज्यपाल हे राज्य आणि मुंबईचे पालक आहेत. त्यांचे वक्तव्य काळजीपूर्वक असायला हवे. भेद निर्माण करणारे वक्तव्य नसले पाहिजे. दुर्दैवाने राज्यपाल यांनी कायमच असे वक्तव्य, तसेच कृती केली आहे. ती राज्याच्या हिताची कधीच राहिली नाही. गुजराती असो किंवा राजस्थानी बांधव तो जेव्हा महाराष्ट्रात आला तर तो महाराष्ट्रीयन झाला. बंधुभावाचे वातावरण बिघडवण्याचे काम राज्यपालांनी करणे हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या