नवी दिल्ली : महागाईसह, इंधन दरवाढ आणि विविध महत्वाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांच्या घोषणाबाजीने लोकसभा दणाणून सोडली. त्यामुळे संसदेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. याची सभापती ओम बिर्ला यांनी दिली
जे सदस्य घोषणाबाजी करत आहेत, त्यांनी चर्चेत सहभाग घ्यावा, असे वक्तव्य लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी केले असून संसदेने काम करावे अशी जनतेची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोनपर्यंत कामकाज ठप्प राहणार आहे. कालपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, देशासाठी हा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. हा काळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आहे. आगामी १५ ऑगस्ट आणि त्यापुढील २५ वर्षांचे विशेष महत्त्व आहे. देश अमृत महोत्सव साजरा करीत आहे तर २५ वर्षांनी देश स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करेल, तेव्हा आपला प्रवास आणि आपण ज्या नवीन उंची गाठू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दुस-या दिवशीही विरोधकांचा गोंधळ
संसदेच्या दुस-या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत महागाईविरोधात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षातील नेत्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी संसदेत अनेक मुद्यांवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. यावेळी सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने दुपारपर्यंत हे कामकाज ठप्प ठेवण्याचा निर्णय सभापतींनी घेतला आहे.