27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयकॉंग्रेस अध्यक्षपदासाठी खरगेंसह तिघे मैदानात

कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी खरगेंसह तिघे मैदानात

एकमत ऑनलाईन

थरुर, त्रिपाठी यांनीही दाखल केला अर्ज, खरगेंचे शक्तिप्रदर्शन
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची संधी होती. केरळमधील खा. शशी थरुर, राज्यसभा खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि झारखंड काँग्रेसचे नेते के. एन. त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. थरुर, त्रिपाठी यांचे अर्ज दाखल करताना मोजकेच कॉंग्रेस नेते उपस्थित होते, तर खरगे यांचा अर्ज दाखल करताना जी-२३ गटातील नेत्यांसह कॉंग्रेसचे बडे नेते सहभागी झाले. त्यामुळे एकप्रकारे त्यांचे शक्तिप्रदर्शन झाले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर राजस्थानात राजकीयनाट्य रंगले. अखेर अशोक गहलोत निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आणि अखेरच्या टप्प्यात मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव समोर आले. खरगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ त्यांच्याच गळ््यात पडण्याची शक्यता आहे. मात्र, शक्तिप्रदर्शनामुळे खा. शशी थरुर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शशी थरुर यांनी मला पक्षाच्या नेतृत्वाने कोणताही उमेदवार अधिकृत उमेदवार नसेल, असे सांगितले होते. खरगे यांच्यासोबत पक्षाचे वरिष्ठ नेते मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते, तर माझ्यासोबत सामान्य कार्यकर्ते होते. ज्यांना पक्षाची स्थिती कायम ठेवायची असेल ते खरगेंना मतदान करतील, ज्यांना बदल हवे असतील ते मला मतदान करतील, असे थरुर म्हणाले.

सोनिया गांधी यांनी कोणताही उमेदवार अधिकृत नसेल, असे सांगितले होते. अनेकांनी निवडणूक लढावी, त्याचे स्वागत केले जाईल, असे त्यांनी सांगितले होते, म्हणून मी निवडणूक लढवत असल्याचे थरुर म्हणाले. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शशी थरुर, मल्लिकार्जून खर्गे, झारखंडमधील के.एन. त्रिपाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. ३ उमेदवारांमध्ये मल्लिकार्जून खरगे यांची बाजू भक्कम मानली जात आहे. सद्यस्थितीत ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

मधुसुदन मिस्त्री यांनी
दिली प्रक्रियेची माहिती
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निर्णय अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती दिली. मधुसूदन मिस्त्री यांनी ३ पैकी एकही उमेदवार पक्षाने अधिकृत केलेला नाही, अशी माहिती दिली. उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचे मिस्त्री यांनी स्पष्ट केले.

…तर दुसरे दलित अध्यक्ष
कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खरगे अध्यक्ष झाल्यास बाबू जगजीवन राम यांच्यानंतर खरगे हे दुसरे दलित अध्यक्ष होतील. जगजीवन राम १९७०-७१ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर आता खरगे यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या