पारगाव : खडकवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या विजया दिलीप डोके (वय ४५ वर्षे) व त्यांचा मुलगा संकेत दिलीप डोके (वय २० वर्षे) या माय-लेकासह संकेतचा जिवलग मित्र ओंकार चंद्रकांत सुक्रे (वय २० वर्षे) या तिघांचा धामारी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीतून जाणा-या बेल्हा-जेजुरी महामार्गावर टेम्पोची दुचाकीला जोरात धडक बसून जागीच मृत्यू झाला आहे तर टेम्पोचालकही जखमी झाला आहे.
हा अपघात शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
आंबेगाव तसेच शिरूर तालुक्यातून जाणा-या बेल्हा-जेजुरी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वारंवार वाढत असताना शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात माय-लेकासह एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. संकेत डोके हा आई विजया डोके हिला
शिक्रापूर येथील नातेवाईकाच्या पूजेच्या कार्यक्रमाला सोडण्यासाठी एमएच. १४ एचआर. ७०७३ या दुचाकीहून गेला होता. परत येताना सोबतीला म्हणून जिवलग मित्र ओंकार सुक्रे याला बरोबर घेतले.
धामारी येथील खंडोबा मंदिराच्या जवळील वळणावर शिक्रापूरच्या बाजूने आलेल्या एमएच. १४ जीयू. ६८८० या टेम्पोची डोके याच्या दुचाकीला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाल्याने दुचाकीवरील तिघांना गंभीर मार लागल्याने संकेत दिलीप डोके, विजया दिलीप डोके या माय-लेकासह ओंकार चंद्रकांत सुक्रे या तिघांचा जागीच मृत्यू झाला.