लखनौ : भारताने दुस-या टी-२० सामन्यात फक्त विजय मिळवला नाही, तर इतिहासही रचला आहे. कारण आतापर्यंत क्रिकेट विश्वात कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे हा विक्रम करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान, माफक आव्हान असूनही भारताला अखेरच्या क्षणापर्यंत झुंजावे लागले. त्यामुळे आजचा विजय थरारक ठरला.
भारताला दुस-या टी-२० सामन्यात विजय मिळवणे क्रमप्राप्त होते. कारण भारताने हा सामना गमावला असता तर त्यांना ही मालिका गमवावी लागली असती. त्यामुळे भारतीय संघासाठी हा करो या मरो, असाच सामना होता. या महत्वाच्या सामन्यात भारताच्या खेळाडूंनीही धडाकेबाज कामगिरी केली आणि विजय साकारला. या विजयामुळे भारताचे या मालिकेतील आव्हान कायम राहिले आहे आणि त्यांनी १-१ अशी बरोबरी केली आहे. पण या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने नवा इतिहास रचला.
या सामन्याचा टॉस झाला आणि भारतासाठी एक वाईट बातमी आली होती. कारण न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा भारतीयांसाठी धक्का होता. कारण या मैदानाचा इतिहास ज्या संघाने या मैदानात प्रथम फलंदाजी केली, त्यांनीच सामना जिंकला असा आहे. त्यामुळे या इतिहासानुसार भारत हा सामना पराभूत होणार असे काही जणांना वाटत होते. पण भारताच्या फिरकी गोलंदाजांनी यावेळी कमाल केली. आपल्या फिरकीच्या जाळ््यात त्यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना फसवले आणि त्यांच्या धावसंख्येवर वेसण घातली. भारताने अचूक आणि भेदक मारा केला आणि न्यूझीलंडला ९९ धावांत रोखले. त्यामुळेच भारताला या सामन्यात विजय मिळवता आला. या विजयासह भारताने इतिहास लिहिला. कारण या मैदानात क्रिकेट विश्वातील कोणत्याही संघाला प्रथम गोलंदाजी करताना सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे भारत हा या मैदानात प्रथम गोलंदाजी करत सामना जिंकणारा पहिलाच संघ ठरला. परंतु हा विजय मिळविताना भारतीय फलंदाजांनाही अखेरपर्यंत झुंजावे लागले.
या सामन्यात विजय मिळवत भारताने या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. त्यामुळे भारताने जर आता तिसरा सामान जिंकला तर त्यांना मालिका विजय साकारता येऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघ तिस-या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.