लॉकडाऊनमुळे ७ लाख दुकाने बंद करण्याची वेळ

    492

    मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेले लॉकडाऊन अर्थव्यवस्थेसाठी किती घातक ठरत आहे, याचे उदाहरण समोर आले आहे. ग्राहक वस्तू कंपन्यांच्या मते, लॉकडाऊनच्या काळात ६ लाखांपेक्षा जास्त छोटी दुकाने बंद झाली असावीत. या दुकानांना रोकड तरलतेचा अभाव, दुकाने परत सुरू न होण्याची भीती किंवा दुकान मालक गावी जाणे अशी कारणे आहेत. हीच परिस्थिती मोबाइल क्षेत्रातही दिसत आहे. अखिल भारतीय मोबाइल विक्री संघटनेच्या मते, बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी दिल्यानंतरही मोबाइल विक्री करणारी दीड लाख दुकाने उघडलेली नाहीत. हा आकडा एकूण दुकानांच्या ६० टक्के आहे.

    या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, दुकानदारांच्या आणखीही काही अडचणी आहेत. वितरक आता रोकडमध्ये व्यवहार करत असून, पूर्वीप्रमाणे ७-२१ दिवसांच्या क्रेडिटची सुविधा बंदी केली आहे. यामुळे बाजारपेठ पुन्हा रुळावर येण्यासाठी आणखी विलंब होऊ शकतो, अशी भीती जाणकार व्यक्त करतात. पार्ले प्रोडक्टच्या मते, घर, रस्ते किंवा चौकांमध्ये पान, चहा विकणारी ५८ लाख छोटी किराणा दुकाने एप्रिल आणि मे महिन्यात बंद पडली आहेत. यामुळे वितरकांना मोठे नुकसान झाल्याचे पार्लेने म्हटले आहे.

    Read More  अमेरिकेची मध्यस्­थी चीनने धुडकावली!

    यापैकी बहुतांश दुकाने आता कायमस्वरुपी बंद झाली आहेत. विशेष म्हणजे १-२ टक्के मोठ्या आकाराची ४२ लाख किराणा दुकानेही बंद झाली आहेत. कारण, अनेक मालक गावी परतले आहेत. ही दुकाने पुढील ५-६ महिन्यांसाठी बंद राहू शकतात. यापैकी काही दुकाने सुरूही होतील, पण ही किराणा दुकाने बंद होण्याचा परिणाम आता थेट कंपन्यांवर होत आहे, अशी माहिती पार्लेचे कॅटेगरी प्रमुख बी कृष्णा राव यांनी दिली.

    बहुतांश दुकाने तात्पुरती बंद झाली असून, लॉकडाऊनमधून सूट मिळताच हळूहळू ही दुकानेही सुरू होतील. पण किराणामध्ये दीर्घकालीन कपात पाहायला मिळू शकते, असे मत ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी यांनी व्यक्त केले. दुसरीकडे कालावधी अनिश्चित असला तरी दुकाने तात्पुरती बंद झाली आहेत, असं मत गोदरेज ग्राहक उत्पादनाचे सीईओ सुनिल कटारिया यांनी व्यक्त केले.

    दुसरीकडे स्मार्टफोन बाजारातही अशीच परिस्थिती आहे. रोकड तरलता, १५ हजारांखालील फोनचे वितरण नसणे, ग्राहक कर्जाची अनुपलब्धता आणि ग्राहक नसणे अशा विविध कारणांमुळे फोन विक्री दुकानांना मोठा फटका बसला असल्याचे फोन विक्री संघटनेचे अध्यक्ष अरविंदर खुराना यांनी सांगितले. ही सर्व आव्हाने असतानाच कामकाजाचा खर्चही दुप्पटीने वाढला आहे. परिणामी हजारो दुकाने बंद करावी लागणार आहेत, असे ते म्हणाले.