24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी युवकांनी सहभाग वाढवावा

देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी युवकांनी सहभाग वाढवावा

एकमत ऑनलाईन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन  ; एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या १२ व्या भारतीय छात्र संसदेचा समारोप समारंभ
पुणे : समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी आणण्यासाठी युवकांनी सहभाग वाढवावा, अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

तसेच सोशल मीडियामुळे वाढणा-­या नकारात्मकतेच्या भावनेलाही वेळीच आवर घालून सकारात्मकता वाढीवर भर द्यावा, असे त्यांनी सूचित केले. भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमारी, राज्याचे युवा आणि ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, मंगेश जाधव हे उपस्थित होते.

याच कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मनोगत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करीत आहोत. त्याचबरोबर लोकशाहीचा उत्सव देखील साजरा केला जात आहे. लोकशाहीला बळकट करणारी युवा पिढी माझ्या समोर आहे याचा मला आनंद आहे. आपल्या देशाला मोठी परंपरा आहे आणि सभ्यतेचे प्रतीक म्हणून देशाकडे पाहिले जाते हे लक्षात घेता युवा पिढीने विकसित आणि विश्वगुरूची संकल्पना जगासमोर पुन्हा एकदा आणावी.

यामध्ये सर्वांचा सहभाग असावा. सोशल मीडियाच्या वापरामुळे तयार होणा-या नकारात्मक भावनेला वेळीच आवर घालायला हवा. त्याचबरोबर सकारात्मक भावनेतून देशाच्या बळकटीसाठी प्रयत्न करा. कोणताही देश हा मूल्य संस्कृती, कष्टाच्या आधारावर मोठा होतो असे त्यांनी सांगितले. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू प्रा.डॉ. रवी चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. गौतम बापट यांनी केले. डॉ. के. गिरीसन यांनी आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या