जेजुरी : सोपानकाकांच्या सासवडमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मल्हारी मार्तंड खंडोबाला भेटण्यासाठी वारकरी मोठे आतुर झालेले असतात.
त्यामुळे सासवड सोडताच ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष कानी पडत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा काल यवतमध्ये मुक्काम होता. तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतवरून प्रस्थान ठेवेल. त्यानंतर वरवंडमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारक-यांना आता मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भेटीची आस लागलेली आहे. सासवडहून निघालेल्या माऊलींच्या पालखीसोबतचे वारकरी सकाळपासूनच जेजुरीमध्ये पोहोचायला सुरू झालेले आहेत. आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर पहिल्यांदाच वारक-यांना विस्तीर्ण असा पालखी मार्ग मिळाला.
त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना वारकरी मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या भेटीसाठी जणू आतुर झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
दुपारचा विसावा आटोपल्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा जेजुरीकडे कूच करतो. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात सोबत येळकोट येळकोट जय मल्हार सुरू होतो. एकदा साकुर्डीचा टप्पा ओलांडला की खंडोबाच्या भेटीसाठी आसुसलेला वारकरी वायुवेगाने पावले टाकतो. अखंड लवथळेश्वर मंदिराजवळ पालखी पोहोचतातच या ठिकाणाहून मल्हारी मार्तंडाचा गड दिसला की ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा एकच जयघोष होतो.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत जेजुरी नगरीमध्ये माऊली महाराजांचा पालखी सोहळा पोहोचणार आहे. पालखी मार्गावरील कमानीजवळ जेजुरीकरांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत होत आहे. माऊलींच्या पालखीवर भंडारा उधळला गेल्यानंतर पंचक्रोशीतील अबाल-वृद्ध या पालखी मार्गावर जमा झाले आहेत. सायंकाळी माऊली महाराजांची पालखी जेजुरीमध्ये पोहोचल्यानंतर या ठिकाणी आजचा या पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे.