22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रआजचा युक्तिवाद पूर्ण ; महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी उद्यावर

आजचा युक्तिवाद पूर्ण ; महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी उद्यावर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्टा काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून वारंवार बंडखोरांकडे दुस-या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. तर शिंदे गटाने वारंवार आपण अद्यापही पक्षातच असून सदस्यत्व सोडले नसल्याचा दावा केला.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने यावेळी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्याने तयार करण्यास सांगत उद्या म्हणजेच गुरुवारी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी पार पडली.

शिंदे सरकारच्या वैधतेला, विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान देणा-या याचिका आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटिशींना आव्हान देणा-या याचिकांवर आज एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. सुनावणीदरम्यान शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे निर्णयाचे अधिकार देण्याची मागणी केली असता सुप्रीम कोर्टाने खडसावले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना कोणाची हे ठरविण्यासाठी पुरावे दाखल करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांना ८ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. त्या निर्णयास आव्हान देणा-या याचिकेवर सुनावणीची विनंती सरन्यायाधीशांना गेल्या आठवड्यात करण्यात आली होती. ही याचिकाही अन्य याचिकांबरोबर सुनावणीसाठी घेण्यात आली होती.

शिंदे गट शिवसेनेवर दावा करू शकत नाही : सिब्बल
शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने सर्व प्रतिज्ञापत्रे कोर्टाला सादर केल्याचे सिब्बल यांनी सांगितले आहे. तसेच शिंदे गटाकडून करण्यात आलेले दावेही खोडून काढण्यास सुरुवात केली आहे. विधिमंडळात आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

सिब्बल यांनी हा दावा खोडून काढला आहे. दोन तृतीयांश लोक मूळ पक्षावर दावा करू शकत नाही. तसेच विधिमंडळात बहुमत असले म्हणजे अख्खाच्या अख्खा पक्ष त्यांचा होऊ शकत नाही, असे सांगतानाच शिंदे गटाचा युक्तिवाद मान्य केला तर उद्या बहुमताच्या जोरावर सरकारे पाडली जातील. त्यामुळे दहाव्या अनुसूचीला काहीच अर्थ उरणार नाही, असे सिब्बल यांनी म्हटले आहे. यावेळी सिब्बल यांनी मूळ पक्ष काय याची व्याख्याच कोर्टाला वाचून दाखवली.

कपिल सिब्बल यांनी अत्यंत प्रभावी युक्तिवाद करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गट शिवसेनेवर दावा करू शकत नाही. विधिमंडळात बहुमत आहे, म्हणजे पक्षावर मालकी होऊ शकत नाही. उद्या बहुमताच्या जोरावर सरकारे पाडली जातील. त्यामुळे दहाव्या अनुसूचीला अर्थ राहणार नाही, असे कपिल सिब्बल यांनी कोर्टात म्हटले आहे. शिंदे गटाने बंड मान्य केले आहे. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये किंवा इतर पक्षात विलीन होणे अथवा नवा पक्ष स्थापन करणे हाच पर्याय उरतो, असे सिब्बल यांनी सांगितले.

शिंदे गटाने फूट मान्य केली आहे
शिवसेनेत फूट पडली आहे. निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाने फूट मान्य केली आहे. त्यामुळे शिंदे गटाला निवडणूक आयोगासमोर मूळ पक्ष असल्याचे मान्य करावे लागणार आहे, असे सांगतानाच फूट हा त्यांच्यासाठी बचाव असूच शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी सिब्बल यांनी मूळ पक्षाची व्याख्याच वाचून दाखवली. दहाव्या अनुसूचीत मूळ पक्षाची व्याख्या करण्यात आल्याचेही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

निवडणूक आयोग ठरवेल
नवा गट स्थापन झाला आहे का? अशी विचारणा यावेळी कोर्टाने केली. त्यावर जे करायचे ते निवडणूक आयोगासमोर करावे लागेल, असे सिब्बल म्हणाले. तेच पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णयही निवडणूक आयोगच करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार पात्र आहेत की अपात्र याबाबतचा निर्णय केवळ स्पीकर घेतात, असेही त्यांनी सांगितले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या