परभणी : गंगाखेड तालुक्यात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सुप्पा (ज) या गावात दुर्लक्षित असलेल्या तोफेला जिल्हास्तरावर लोकचळवळ उभारून लोकवर्गणीतून सागवानी तोफगाडा बसवून त्या तोफेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने करण्यात येत आहे. सह्याद्रीचे दुर्गसेवक व ग्रामस्थ मंडळी सुप्पा यांच्या अविरत प्रयत्नानंतर श्रमदानातून ही मोहीम उभी राहिली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रविवार दि. १५ रोजी सकाळी १० वाजता सुप्पा (ज) या गावात किल्ले सुप्पा तोफगाडा दुर्गार्पण सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्याला प्रमुख आकर्षण म्हणुन पावनखिंड चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर, बाजीप्रभूंची भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर, कोयाजी बांदलांची भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय वाघमारे, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे असणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, डॉ. वीणा भालेराव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर यांची उपस्थिती असणार आहे. सर्व जिल्हावासियांना आणि इतिहासप्रेमींना या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ मंडळी सुप्पा यांच्या वतीने करण्यात आले आहे.