18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठवाडा आणि विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळवण्याच्या प्रकल्पाला जागतिक बँकेने अर्थसहाय्य करावे असेही ते म्हणाले. जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

बैठकीत महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प, हवामान बदल आणि त्यामुळे कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, बेस्टसाठी इलेक्ट्रिक बसेस याबाबत देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. बेस्टसाठी इलेक्ट्रिकल बसेस, कौशल्य विकास प्रकल्प, पोक्रा प्रकल्पाच्या दुस-या टप्प्याबाबत देखील चर्चा झाली.

दरम्यान, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्रात कौशल्य विकास कामे सुरू असून, त्याद्वारे क्षमता बांधणीस मदत होत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे राज्यातील विविध क्षेत्रातील प्रकल्पांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले.

राज्यातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी एक असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे पाच हजार गावांना फायदा होत आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचे सहाय्य लाभले आहे.

त्यामुळे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वितेनंतर दुस-या टप्प्यास मान्यता देण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार
पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पिण्याचे पाणी तसेच लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. यामुळे शेतीला फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

या प्रकल्पासाठी जागतिक बँकेने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी अप्पर मुख्य सचिव कपूर, प्रधान सचिव श्रीमती वर्मा, श्री. गुप्ता, डवले यांनी आपापल्या विभागाच्या प्रकल्पांविषयी माहिती दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या