29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeमहाराष्ट्र११ तासांनंतर चांदणी चौकातील वाहतूक सुरू

११ तासांनंतर चांदणी चौकातील वाहतूक सुरू

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील जूना उड्डाणपूल मध्यरात्री १ वाजता तब्बल ६०० किलो स्फोटकांनी पाडण्यात आला. तब्बल ११ तासांनंतर ढिगारा हटवण्याचे काम पूर्ण झाले असून आता चांदणी चौकातून वाहतूकही सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूकही हळूहळू सुरळीत होत आहे.

पुलाच्या पाडकामामुळे मुंबईहून साता-याकडे जाणारी वाहतूक वाकडमार्गे शिवाजी नगर आणि तेथून कात्रज अशी वळवण्यात आली होती. त्यामुळे आज सकाळी या मार्गावर अवजड वाहने प्रचंड असल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. तसेच, साता-याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक नवरे पूलमार्गे वळवण्यात आली होती.

या मार्गावरही वाहनांची संख्या वाढल्याने अनेक वाहने रस्त्यावरच वाहतूक कोंडीत अडकले होते. सकाळी या रस्त्यांवर तब्बल ३ किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, आता चांदणी चौकातील वाहतूक सुरु झाल्याने इतर मार्गांवरील वाहतूक कोंडीही कमी होत आहे.

दरम्यान, मध्यरात्री १ वाजता पूल पाडल्यानंतर रात्रीतूनच सर्व ढिगारा उचलण्यात येईल व सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, ढिगारा उचलण्याचे काम सकाळी १० वाजेपर्यंत चालू होते. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पुलाच्या पाडकामामुळे पुण्यातील वाहतूक पर्यायी मागाने वळवण्यात आली होती. चांदणी चौकातील पुलाचा ढिगारा पूर्णपणे उचलल्यानंतर येथूनही सकाळी ८ वाजेनंतर वाहतूक सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, ढिगारा हटवण्यास उशीर झाल्याने पुण्यातील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे पर्यायी मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. विशेषत: पुण्यातील वाकड, खेड, शिवापूर येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. टोलनाक्यावरही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

पुल २ टप्प्यात पाडल्यामुळे वाहतूक कोंडी
नोएडातील प्रसिद्ध ट्विन टॉवर काही क्षणांत जमीनदोस्त करणा-या ईडीफाईस कंपनीकडूनच चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला. मात्र, हा पूल दोन टप्प्यात पाडण्यात आला. ६०० किलो स्फोटकांनी केवळ अर्धाच पूल पडला. उर्वरित पूल नंतर पोकलेनच्या सहाय्याने पाडण्यात आला. त्यामुळे पूर्ण पूल पाडण्यास व ढिगारा हटवण्याच्या कामाला विलंब झाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या