27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeमहाराष्ट्रलक्ष्मण जगताप यांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

लक्ष्मण जगताप यांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

एकमत ऑनलाईन

मुंबई : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाशी झुंज देत होते. आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने धडाडीचा आणि लोकप्रिय आमदार गमावला, अशा शब्दांत राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

 • सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटुंबियांना दु:खातून सावरण्यासाठी शक्ती देवो ही प्रार्थना, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 • पक्षाचे मोठे नुकसान : देवेंद्र फडणवीस
  पिंपरी-चिंचवडच्या विकासात लक्ष्मण जगताप यांचे मोलाचे योगदान होते. पक्षाशी त्यांची घनिष्ठ निष्ठा होती. आजारी असतानाही मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी रुग्णवाहिकेने ते आले. त्यांच्या जाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
 • जगताप यांचे जाणे चटका लावणारे :  चंद्रकांत पाटील
  पिंपरी-चिंचवडमधून तीन वेळा निवडून आलेले आमदार आणि माझे जवळचे सहकारी लक्ष्मण जगताप यांचे निधन खूपच धक्कादायक आहे. पक्षनिष्ठा आणि समर्पणाचा लक्ष्मणजी वस्तुपाठ होते. बरे होतील असे वाटत असतानाच त्यांचे असे जाणे चटका लावणारे आहे. आम्ही सगळे जगताप कुटुंबासोबत आहोत, अशा शब्दांत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.
 • धडाडीचा लोकप्रतिनिधी गमावला : अजित पवार
  चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला असल्याची भावना व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले.राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडणारा धडाडीचा लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे.
 • लोकप्रिय नेतृत्व गमावले : सुप्रिया सुळे
  चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. आपल्या भागातील अतिशय लोकप्रिय नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे जगताप कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
 • छगन भुजबळ यांच्याकडून श्रद्धांजली
  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लक्ष्मण जगताप यांनी नगरसेवक पद, महापौरपद भूषविले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थातून विधान परिषदेत, त्यानंतर विधानसभेतही आमदार म्हणून काम केले. त्यांच्या निधनाने पिंपरी-चिंचवड मतदारसंघातील नागरिक एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला कायमचे मुकले आहेत, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे.
 • त्यांची पक्षनिष्ठा सदैव स्मरणात राहील : मुरलीधर मोहोळ
  पक्षनिष्ठेचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात असलेले त्यांचे योगदान आणि त्यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या