सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद

    395

    श्रीनगर: दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाल्याची घटना घडली. इफ्तारनिमित्त पाव आणण्यासाठी जिया-उल-हक (३४) आणि राणा मंडल (२९) गेले असताना बाजारात बेकरीजवळून जाणाºया मोटरसायकलवरील दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, अशी माहिती अधिका-यांनी गुरुवारी दिली. श्रीनगरबाहेरील सुरा येथे बुधवारी संध्याकाळी हा हल्ला झाला.

    द रेझिस्टन्स फ्रंट या पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तय्यबाच्या संलग्न संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी अगदी जवळून जवानांना गोळी मारली आणि गर्दीच्या परिसरातील गल्ल्यांमधून ते पळून गेले. हक आणि मंडल हे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील रहिवासी आहेत. परंतु अम्फन चक्रीवादळामुळे राज्यातील विमानतळ बंद असल्याने दोघांचे मृतदेह घरी पाठवता येणे शक्य नाही, अशी माहिती अधिकाºयांनी दिली. या दोघांच्याही डोक्याला गंभीर इजा झाली होती.

    Read More  पावसाळ्यानंतरच देशात क्रिकेट सुरू!

    हे दोन्ही जवान ३७व्या बटालियनचे असून त्यांची पंडाक कॅम्प येथे नियुक्ती झाली होती. शेजारील गंदेरबल जिल्ह्यातून श्रीनगरमध्ये येणाºया-जाणाºया मार्गावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. दिवसभराच्या उपवासानंतर पाण्याचा एक थेंबही न घेता हे दोघे जग सोडून गेले, अशा शब्दांत ३७व्या बटालियनमधील जवानांनी शोक व्यक्त केला. २००९मध्ये सीमा सुरक्षा दलात दाखल झालेल्या हक यांच्या पश्चात पालक, पत्नी आणि दोन मुली आहेत. यातील चार वर्षांची मुलगी मूकबधीर आहे. दुसरी मुलगी सहा महिन्यांची आहे. मंडल यांच्या पश्चात त्यांचे पालक, पत्नी आणि सहा महिन्यांची मुलगी आहे.