मुंबई : राज्य गुप्तचर विभागाने अर्थात एसआयडीने महाराष्ट्रातील राजकीय संकटाची कल्पना दोन महिन्यांपूर्वीच सरकारला दिली होती; परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावा महाराष्ट्र पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह आठ ते दहा आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात होते, अशी गोपनीय माहिती एसआयडीच्या अधिका-यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिली होती.
राज्यातील संभाव्य घडामोडींवर लक्ष ठेवणे, राजकीय घडामोडी आणि हालचाली, गुन्हे तसेच समाजकंटक, दहशतवादी आणि माओवादी कारवायांबद्दल आगाऊ सूचना देणे हे एसआयडीचे काम आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी राज्य गुप्तचर विभागाची स्थापना केली. एका वरिष्ठ आयपीएस अधिका-याच्या माहितीनुसार राजकीय घडामोडींची माहिती अनेकदा सरकारला तोंडी दिली जाते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा अंदाज घेण्यात शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकार अयशस्वी ठरले आहे.
एसआयडीने एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची पूर्वकल्पना दिली होती. अशा परिस्थितीत एसआयडीच्या मदतीने काहीतरी पावलं उचलायला हवी होती. अनेक वेळा राजकारण्यांचे विशेष सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त केलेल्या पोलिस अधिका-यांकडून राज्य पोलिसांना गुप्तचर माहिती देखील मिळते, असे सूत्रांनी सांगितले.