मुंबई : मुंबईत एक अतिशय भयंकर अशी दुर्घटना घडली आहे. वरळी येथे एका इमारतीच्या ४२व्या मजल्यावरून दगड कोसळून दोन पादचा-यांचा जागीच मृत्यू झाला आहे. साबीर अली (वय ३६) आणि इम्रान अली खान (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत.
वरळी परिसरात या इमारतीचे बांधकाम सुरू होते. येथे यापूर्वीही इमारतीवरून बांधकामाचे दगड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे.
वरळी परिसरातून साबीर अली आणि इम्रान अली खान हे बुधवारी रात्री जात होते. यावेळी बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवरून भला मोठा दगड खाली पडला. हा दगड ४२ व्या मजल्यावरून पडल्याचे समजते. या दगडाखाली साबीर अली आणि इम्रान अली सापडले. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. ते घटनास्थळी तसेच पडून होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.