नाशिक : नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात एक दु:खद घटना घडली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला आहे. दहावीचा पेपर देण्यासाठी जात असताना दोन विद्यार्थ्यांना एका ट्रकने चिरडल्याने दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील आगस्टखिंड येथील रहिवासी असलेले शुभम रामदास बरकले (वय १४) आणि दर्शन शांताराम आरोटे (वय १४) हे दोन मित्र पांढुर्ली येथील जनता विद्यालय येथे आज (गुरुवार) इयत्ता दहावीचा पेपर देण्यासाठी आपल्या अॅक्टिव्हा या दुचाकीवरून जात होते.
आगस्टखिंड येथे भरधाव वेगात येणा-या एचपी गॅसच्या ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दहावी बोर्डाचा पहिलाच पेपर असून पेपर देण्यासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
दरम्यान, सिन्नर तालुक्यातील आगस्टखिंड येथील विद्यार्थी पेपर देण्यासाठी पांढुर्ली येथील शाळेत जात होते. परंतु त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे आगस्टखिंड परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.