मुंबई : राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. गेल्या काही महिन्यांत शिंदे गटाचे बंड आणि त्यानंतर घडलेल्या एकदंरीत राजकीय उलाढालीनंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच काल पहिल्यांदा उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल झाले.
उद्धव ठाकरे काल दुपारी विधानभवन परिसरात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही होते. तर, उद्धव ठाकरे आतमध्ये प्रवेश करण्याच्या ठिकाणीच समोर दीपक केसरकर उभे होते. तेव्हा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. परंतु, उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले, त्यानंतर त्यांनी दुस-यांदा नमस्कार केला, मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी बघितलेच नाही. त्यानंतर तिस-यांदा जेव्हा दीपक केसरकरांनी नमस्कार केला, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे देखील आले होते. दीपक केसरकरांनी त्यांनाही नमस्कार केला. परंतु, आदित्य ठाकरेंनी केसरकरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तेथून पुढे निघून गेले.
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार बंड पुकारत सत्तेतून बाहेर पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना हे नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणही घेतले. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील मतभेद वाढत असल्याचेही यावेळी दिसून आले.