मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या घरी दाखल झाले. जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त या दोन्ही शिवसेना नेत्यांची सदिच्छा भेट झाली. यावेळी ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, कालच मनोहर जोशींनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या भेटीला वेगळे महत्व आले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींची भेट घेतली होती. त्यामुळे आता जोशीदेखील शिंदे गटात सामिल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण खुद्द जोशींनीच आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना माझे रक्त हे शिवसेनेचे आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, उद्धव ठाकरेंचा सहवास मला लाभला आहे. त्यामुळे मी शिवसेनेचाच आहे.
दरम्यान, शिवसेनेत उद्धव ठाकरे शिवसेनेत सक्रीय झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशींचा प्रभाव कमी होत गेला होता. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मनोहर जोशी आता शिंदे गटात सामिल होतील, अशा चर्चाही सुरु झाल्या होत्या. पण त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.