नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाविरोधातील या लढाईत भारताच्या उपाययोजनांचं कौतुक जागतिक स्तरावर केले जात आहे. लोकसंख्येच्या बाबतीत मोठा देश असूनही अन्य देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार भारतात कमी आहे. भारताने कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगालाही मदत झाली आहे. याचेच फलित म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. हर्षवर्धन २२ मे रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.
काय असणार जबाबदारी
माहितीनुसार, क्षेत्रीय गटांमध्ये अध्यक्ष पद एक वर्षासाठी दिले जाते. गेल्या वर्षी हे ठरवण्यात आले होते़ येत्या शुक्रवारपासून यातील पहिले वर्ष सुरू होणार असून यासाठी भारताचा प्रतिनिधी कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष असणार आहे. आरोग्य सभेच्या सर्व निर्णयांना आणि धोरणांना प्रभावी बनवण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांकडे असते. या कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात आणि यापैकी मुख्य बैठक ही जानेवारी महिन्यात होते.
Read More उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा ६ नवे कोरोनारुग्ण
जपानच्या डॉ़ हिरोकी नकाटानी यांच्या जागी नियुक्ती
डॉ. हर्षवर्धन जपानच्या डॉ़ हिरोकी नकाटानी यांची जागा घेतील. नकाटानी सध्या ३४ सदस्यीय डब्ल्यूएचओ कार्यकारी बोर्डाचे अध्यक्ष आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण पूर्व आशिया समुहाने गेल्या वर्षी सर्वानुमते निर्णय घेतला होता की, भारताला तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर निवडले जावे. मंगळवारी १९४ देशांच्या जागतिक आरोग्य सभेमध्ये भारताला कार्यकारी मंडळात नियुक्त करण्याबाबतच्या प्रस्तावावर सह्या झाल्या असल्याची माहिती आहे.
देशात रिकव्हरी रेट ३८़७३ टक्के देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात सध्या एकूण १ लाख १ हजार १३९ रुग्ण आहेत. आतापर्यंत ३१६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत २३५० रूग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ३९ हजार १७४ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. देशात सध्या रिकव्हरी रेट ३८़७३ टक्के आहे. देशात एकूण ५८ हजार ८०२ सक्रिय रुग्ण (अॅक्टिव्ह) म्हणजे ज्यांचावर उपचार सुरू आहे. त्याच वेळी केवळ २़९ टक्के कोरोनाबाधित रुग्णांना आयसीयूची आवश्यकता आहे.