मुंबई : शिवसेनेचे मराठवाड्यातील नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, खोतकरांकडून ठोस प्रतिक्रिया मिळू न शकल्याने याबद्दल खोतकरांचे तळ्यात-मळ्यात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत, असे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच, दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे खोतकर यांनी म्हटले होते, असा खुलासाही राऊत यांनी केला.
जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. त्यांनीच याबाबत बोललं पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच दोन दिवसांपूर्वीच माझे अर्जुन खोतकर यांच्याशी बोलणे झाले. त्यावेळी त्यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती.
दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले होते. दानवेंबाबत त्यांनी आणखी काही शब्द वापरले होते. ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. जोपर्यंत खोतकर स्वत:हून सांगत नाहीत तोपर्यंत ते शिवसेनेतच आहेत.
त्यांनीच याबाबत बोलले पाहिजे, असे संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.
रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकरांशी जवळपास दीड तास दिल्लीत चर्चा केली आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघात एकमेकांचे विरोधक असलेल्या दोन नेत्यांमधील वैर संपले का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान काल खोतकरांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण मी अजून शिवसेनेतच असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या मालमत्तेवर काही दिवसांपूर्वी ईडीची धाड पडली होती त्यामुळे ते शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.