इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला मागील दोन दिवसापासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्याला आता नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस अशा दुहेरी अवस्थित सापडलेला शेतकरी आता मात्र हवालदिल झाला असून गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळीने फळे भाजीपाला पिकांसह पशुधनाच्या चाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सध्या तालुक्याच्या दक्षिण भागात नीरेचे पात्र कोरडे ठाक पडल्याने पाणी टंचाईची प्रचंड समस्या निर्माण झाली असून पाण्याअभावी पिके जळून चालली आहेत. तर दुसरीकडे आहे त्या उपलब्ध पाण्यावर पिकवलेला भाजीपाला कोरोनमुळे शेतातचं बांधावर टाकण्याची वेळ शेतक-यावर आली आहे. सर्वत्र कोरोना विषाणूचे थैमान असल्याने इंदापूर तालुक्यातील सर्व आठवडे बाजार बंद आहेत त्यामुळे योग्य किमतीने भाजीपाला विकने शेतक-यांना सध्या तरी शक्य नाही.
Read More आमदार धिरज देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर
अवकाळी पावसाने टाॅमेटो,केळी,खरबुज,कलिंगड यांसह इतर भाजीपाल्याचा चक्काचूर झाला असून पेरू,आंबा,केळी, पपईचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे एकीकडे लाॅकडाऊन तर दुसरीकडे अवकाळीचा तडाखा अशा वेळी इकडे आडं अनं तिकडे विहीर अशी दयनीय अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. तर हातातोंडाशी आलेला घासही आता अवकाळी पावसाने ओढून घेतला असून गेल्या दोन दिवसात इंदापूर तालुक्याच्या विविध भागात वादळी वा-यासह पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे बळीराजा चिंतेत आहे.