न्यूयॉर्क : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच देश लसीकरणावर अधिक भर देत आहेत. अमेरिकेत आता पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे अमेरिकेत लवकरच 5 वर्षांच्या लहान मुलांचं लसीकरण सुरू करण्यात येईल. या लसीकरण मोहिमेअंतर्गत मॉडर्ना आणि फायजर या लसींचा वापर केला जाईल. अमेरिकन नियामक मंडळाने लसीकरण मोहिमेअंतर्गत पाच वर्षांखालील लहान मुलांच्या लसीकरणाला शुक्रवारी परवानगी दिली आहे. यानुसार पुढील आठवड्यापासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल. अमेरिकेत पाच वर्षांपर्यंतचे सुमारे १८ दशलक्ष लहान मुलं आहेत.
अन्न आणि औषध प्रशासनाने शिफारस करण्याआधी त्यांच्या सहसल्लागार समितीने मॉडर्ना आणि फायजर लसींच्या लसीकरणाला मंजुरी दिली होती. अमेरिकेत प्रौढांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर सुमारे दीड वर्षानंतर पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली. देशात पाच वर्षांपर्यंतच्या वयोगटातील अंदाजे १८ दशलक्ष मुलं आहेत.
मॉडर्ना आणि फायजर लसींना परवानगी
अन्न आणि औषध प्रशासनाने शाळकरी मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी मॉडर्ना लसीला देखील मंजुरी दिली आहे. यापूर्वी या मुलांसाठी फक्त फायजर लसीला परवानगी होती. एफडीएच्या शिफारशीनुसार पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लसीकरणाला आता फक्त रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून मंजुरी आवश्यक आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे सल्लागार तज्ज्ञांकडून शनिवारी निकाल देतील. सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल वॉलेन्स्की अंतिम मंजुरी देतील.