वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
जगभरात आज मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर डाऊन झाले. त्यामुळे ट्विटरचे अनेक यूजर्स त्यांच्या पेजवर कोणतेही नवीन ट्वीट पाहू शकत नव्हते. यासंबंधी अनेक लोकांनी आपल्या तक्रारी व्यक्त केल्या असून सोशल मीडियावर ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. इलॉन मस्क यांनी मालकी घेतल्यापासून आतापर्यंत चौथ्यांदा ट्विटर डाऊन झाले आहे. या आधी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ट्विटरची सेवा काही तासांसाठी बंद झाली होती. त्यावेळीही यूजर्संना कोणताही नवीन मेसेज दिसत नव्हता किंवा ते कोणतीही नवीन पोस्ट करू शकत नव्हते. इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून ट्विटर प्लॅटफॉर्म अनेक वेळा तांत्रिक समस्यांना बळी पडत आहे आणि काहीवेळा तासनतास डाऊन झाले आहे. सध्या प्लॅटफॉर्म डाऊन झाल्यामुळे ट्विटरवरून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. बराचवेळा हा तांत्रिक बिघाड सुरू होता. त्यामुळे युजर्स संभ्रमात पडले होते.
ट्विटरचे नवे सीईओ ईलॉन मस्क यांनी काही काळापूर्वी सांगितले होते की, त्यांची टीम ट्विटर यूजर्सना येत असलेल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देत आहे. मात्र यावेळीदेखील जगभरात ट्विटर डाऊन आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. कारण ट्विटरवर बराच वेळ कोणतीही पोस्ट टाकता आली नाही आणि दिसली देखील नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण अलिकडे सातत्याने असे प्रकार घडत आहेत.
ट्विटरने नुकतेच २०० लोकांना कामावरून काढून टाकले आहे. याआधीही ट्विटरने हजारो कर्मचा-यांंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. उत्पादन व्यवस्थापक, अभियंते आणि डेटा सायंटिस्ट विभागातील लोक २०० कर्मचा-यांमध्ये आहेत, ज्यांनी आपली नोकरी गमावली आहे. ब्लू व्हेरिफिकेशन सबस्क्रिप्शनच्या प्रमुखालाही कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. तसेच ट्विटरच्या सेल डिपार्टमेंटच्या हेडचीही नोकरी गेली आहे. त्याचाही फटका बसत असावा, असा कयास लावला जात आहे.