गडचिरोली : महाविकास आघाडीची कालची सभा ही सत्ता गेल्याने बावचळलेल्या, निराश आणि तोल गेलेल्यांची सभा होती. निवडणुका योग्यवेळी होतील आणि त्यावेळी आम्ही त्यांना चारीमुंड्या चित करू, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआला दिले आहे. कालच्या वज्रमूठ सभेवरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे.
महाविकास आघाडीची सोमवारी (दि. १) महाराष्ट्र दिनी बीकेसी मैदानावर सभा पार पडली. या सभेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. या टीकेला आता शिवसेना-भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आशिष शेलारांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मविआचा समाचार घेतला आहे.
गडचिरोलीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण प्रत्येक जिल्ह्यात खरिपाची बैठक घेत असतो. आता लवकरच खरिपाचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे १५ तारखेपूर्वी या बैठका घेण्याचे आमचे नियोजन आहे. पहिली बैठक गडचिरोलीत होत आहे. उद्धव ठाकरेंनी काल भाजपला अस्मान दाखवू, अशी टीका केली होती.
या टीकेवर फडणवीस म्हणाले, कालची सभा ही निराश लोकांचे अरण्यरुदन आहे. ज्यांची सत्ता गेल्यामुळे ते निराशही आहेत, बावचळलेलेही आहेत आणि त्यांचा तोलही गेलेला आहे. अशा लोकांनी काही बोलल्यावर किती गंभीरतेने घ्यायचे हे ठरवायला हवे.
तोंडाची वाफ दवडणारे
देवेंद्र फडणवीस म्हणाले, यांना फक्त टीका करायची आहे. आम्हाला विकास करायचा आहे. यांनी अडीच वर्षांत फक्त घोषणा केल्या. लोकांमध्ये जाऊन काम आम्ही करत आहोत. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या ३५० शाखा काल सुरू झाल्या. हे फक्त तोंडाची वाफ दवडणारे लोक आहेत.
ठाकरे यांची भूमिका दुटप्पी
देवेंद्र फडणवीस बारसू प्रकल्पाबद्दल बोलताना म्हणाले, मुळातच स्थानिक लोक थोडे आहेत. रिफायनरीला स्थानिकांचे समर्थन नाही. बारसूमध्ये बाहेरून लोक आणून आंदोलने केली जात आहेत. सरकारला बदनाम करता येईल असे काही घडवण्याचा कट आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आहे. बारसूत प्रकल्प व्हावा यासाठी आधी हेच पत्र देतात आणि आता हेच आंदोलनात जात आहेत. यांचा दुहेरी चेहरा समोर आला आहे. काही नेते वारंवार आंदोलनाला असतात. राज्यात तणाव निर्माण करणा-या एका गटाबाबत माहिती मिळाली आहे.
बाबरी पडली तेव्हा उद्धव ठाकरे मुंबईतच
देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणुका घ्या.. निवडणुका घ्या असे म्हणत असतात. निवडणुका कधीही घेता येत नाहीत. निवडणुका योग्य वेळी घेणारच आहे आणि तुम्हाला पाडून दाखवू, निवडणुका योग्यवेळी होतील आणि त्यावेळी आम्ही त्यांना चारीमुंड्या चित करू. बाबरी पडत असताना त्याठिकाणी भाजपचे कार्यकर्ते नव्हते, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. यावर बाबरी जेव्हा पडत होती त्यावेळी तुम्ही कुठे होता. मी हजारो कार्यकर्त्यांसोबत त्याठिकाणी होतो. तुम्ही मुंबईच्या बाहेर पडले नाहीत.