सोलापूर, शिर्डीच्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण झाले. मोदी यांनी या दोन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेन मुंबई आणि पुण्यासारख्या आर्थिक केंद्रांना भक्तीच्या केंद्रांशी जोडतील. महाराष्ट्रातील पर्यटन आणि तीर्थयात्रेसाठी या ट्रेनचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथे दोन वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ झाला. मुंबई ते साईनगर शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन एक्स्प्रेसला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. एक काळ असा होता की खासदार पंतप्रधान कार्यालयात किंवा रेल्वे मंत्रालयात चिठ्ठी पाठवायचे आणि सांगायचे की अमूक अमूक ट्रेन या स्टेशनला दोन मिनिटे, पाच मिनिटे थांबेल का पाहा. आज वंदे भारत एक्स्प्रेस आपल्याकडे का नाही? कधी येणार? यावर ते चर्चा करताना दिसतात. पूर्वीच्या काळातला आणि आताचा हा महत्त्वाचा फरक आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे हे गरजेचे आहे. त्यामुळेच देशात मेट्रोचे जाळे वाढवले जात आहे. तसेच एअरपोर्ट आणि बंदरेही बांधली जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणदेखील उपस्थित होते.
वंदे भारतने १७ राज्यांत
१०८ जिल्हे जोडले
वंदे भारत ट्रेन ही आधुनिक भारताचे प्रतीक आहे. भारताची प्रगती आणि वेग या दोन्हीची ही खूण आहे. वंदे भारत ट्रेनने देशातल्या १७ राज्यांमधील १०८ जिल्हे जोडले गेले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
भाविकांची सोय
मुंबई-सोलापूर या वंदे भारत ट्रेनमधून पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी, सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोट आणि आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना या ट्रेनचा प्रवास करणे सोयिस्कर होणार आहे. जेव्हा हीच ट्रेन सह्याद्रीच्या कुशीतून जाईल, तेव्हा प्रवाशांना निसर्गाचे सौंदर्यदेखील बघायला मिळेल. या ट्रेनमुळे पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील रेल्वेकरिता
अर्थसंकल्पात तरतूद
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही मिळाले नाही, अशी टीका करणा-या विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात उत्तर दिले. काहीजण विचारतात महाराष्ट्रासाठी काय मिळाले? त्यांनी बहुतेक देशाचा अर्थसंकल्प वाचलेला नाही. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५०० कोटींची तरतूद आहे. आजवर कधीही एवढा निधी मिळालेला नाही. राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखो प्रवाशांना फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई ते शिर्डीचा प्रवास ५.३० तासांत आणि मुंबई ते सोलापूरचा ६ तास ३० मिनिटांत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.