मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत सकाळी साडेदहा वाजता ईडी कार्यालयात दाखल झाल्या. पत्राचाळ घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स पाठवले होते. अनोळखी व्यक्तींशी बँक आणि जमिनीचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांच्या समोरासमोर बसवून वर्षा राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
वर्षा राऊत सकाळी ईडी कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांनी गळ्यात आर्म सपोर्टर घातला होता, त्यामुळे त्यांना नेमकी कधी आणि कशी दुखापत झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वर्षा राऊत यांच्यासोबत दीर सुनील राऊत आणि कन्या पूर्वशी राऊतही ईडी कार्यालयापर्यंत आल्या होत्या. वर्षा राऊत सकाळी साडेदहा वाजता चौकशीसाठी पोहोचल्या. आज दिवसभर किती तास त्यांची चौकशी चालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वर्षा राऊत यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्यासंदर्भात ईडीच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयात भाष्य केले होते. संजय राऊत हे यापूर्वी झालेल्या चौकशीवेळी सर्व माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. मात्र, ईडीने त्यांच्या घरावर धाड टाकली तेव्हा काही कागदपत्रे सापडली होती. त्यावरून असे दिसते की, संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. त्यांच्या खात्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आहेत.