23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeअष्टपैलू, सर्जनशील ‘रत्न’!

अष्टपैलू, सर्जनशील ‘रत्न’!

एकमत ऑनलाईन

जगात जे नानाविध प्रांत, क्षेत्र आहेत त्यांच्या वाटचालीत किंवा या प्रांतांच्या, क्षेत्रांच्या इतिहासात असे काही समृद्ध कालखंड असतात जे ‘गोल्डन एरा’ किंवा ‘सुवर्णकाळ’ म्हणून नोंदविले जातात़ हा सुवर्णकाळ निर्माण होतो कारण त्या ठराविक कालखंडात त्या प्रांतात किंवा क्षेत्रात अनेक दिग्गज एकाचवेळी कार्यरत असतात व प्रत्येकाची कामगिरी ही तोडीस तोड व असामान्य संबोधावी अशीच असते़ यात कुणाची कामगिरी सरस, उजवी-डावी हे ठरवणे अत्यंत कठीण कारण या दिग्गजांच्या कार्याची धाटणी व स्वत:ची शैली, ठसा एवढा स्वतंत्र, वेगळा व एकमेवाद्वितीय असतो की, कुठले समान निकष ठरवून त्या दिग्गजांमध्ये तुलनाच करता येत नाही.

मात्र, तरीही व्यवहारात जगरहाटीप्रमाणे अशी तुलना होतेच व सहसा त्याचा निकष हा लोकप्रियता किंवा सर्वाधिक चर्चा हाच असतो! हा निकष खरे तर सर्वार्थाने या दिग्गजांच्या कार्यावर अन्याय करणारा किंवा पक्षपाती ठरणाराच असतो़ मात्र, जगरहाटीत हे होते व त्यातून तुलनेच्या नादात एखाद्या दिग्गजाचे कार्य झाकोळले जाते किंवा त्या कार्याला जो योग्य न्याय, सन्मान मिळायला पाहिजे तो मिळत नाही़ अर्थात जगरहाटीत हे घडते म्हणून त्या दिग्गजाची, त्याच्या कार्याची महती तसूभरही कमी होत नाहीच़ ती उशिराने का असेना पण सिद्ध होते, झळाळून निघते़ असाच काहीसा प्रकार मराठी साहित्य व कला प्रांतात मनसोक्त मुशाफिरी करताना प्रत्येक प्रकारात आपला वेगळा ठसा उमटवत वर्चस्व सिद्ध करणा-या, अष्टपैलूत्व सिद्ध करणा-या रत्नाकर मतकरी या ‘रत्ना’बद्दल झाला.

Read More  ज्येष्ठ नाटककार, लेखक रत्नाकर मतकरी यांचे निधन

सुमारे ७० हून अधिक नाटके, तीही विविध विषयांवरची, विविध धाटणीची व स्वतंत्र शैलीची, २२ बालनाट्ये, असंख्य एकांकिका, २० कथासंग्रह, ३ कादंबºया, १२ लेखसंग्रह, आत्मचिंतनपर पुस्तक, वृत्तपत्रातील विविध विषयांवरचे सदर लेखन, मालिका-चित्रपटांसाठी कथा-पटकथालेखन, त्यांचे दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार वगैरे सर्व काही ‘आॅल इन वन’, कथाकथनकार, सूत्रसंचालक किंवा कार्यक्रमाचे सादरकर्ते अशी सहा-साडेसहा दशकांची अविश्रांत व सातत्यपूर्ण, नेमस्त व शिस्तशीर कारकीर्द असणारे रत्नाकर मतकरी हे अष्टपैलू रत्नच! मात्र, त्यांच्या या सगळ्या प्रवासाची यथोचित समिक्षा व सन्मान मात्र त्यांच्या वाट्याला उशिरानेच आला व त्यांची ओळख घट्ट झाली ती गूढकथा आणि भयकथांचा जनक म्हणून! त्यांच्या या ओळखीने त्यांची इतर सर्व कामगिरी, उत्तुंग कार्य एवढेच काय तर त्यांच्यातला उत्तम चित्रकार, सामाजिक बांधीलकी बेडरपणे पाळणारा सामाजिक कार्यकर्ता या सर्व बाबी झाकोळल्या गेल्या!

या बाबींना जो यथोचित न्याय व सन्मान मिळायला हवा तो मिळाला नाही किंवा खूप उशिराने मिळाला़ विलंबाने मिळालेला न्याय हा अन्यायच असतो़ वयाच्या १७व्या वर्षी रेडिओवर ‘वेडी माणसं’ ही श्रुतिका लिहून आपल्या साहित्य व कलाप्रांतातील मुशाफिरीला सुरुवात करणाºया या ‘रत्ना’च्या मुशाफिरीचा, प्रयोगशीलतेचा, सर्जनशीलतेचा प्रपात मागची सहा-साडेसहा दशके अखंडपणे, सातत्यपूर्णतेने व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अद्भूत लयीत कोसळत राहिला! रसिकांना, चाहत्यांना चिंब करत राहिला, तृप्त करत राहिला, अद्वितीय आनंद, अद्भूत समाधान देत राहिला़ मात्र, प्रचंड मोठे नाट्यकर्तृत्व असूनही या ‘रत्ना’च्या वाट्याला नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद शेवटपर्यंत आले नाही तर साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळण्यासाठी त्यांना वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत प्रतीक्षा करावी लागली़ कदाचित साहित्यिक, कलाकार असण्याबरोबरच एक सामाजिक बांधीलकी बाळगणारा व परिणामांची चिंता न करता समाजहितासाठी, सत्यासाठी बेडरपणे व्यक्त होणारा सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या व्यवस्थेत जी एक किंमत मोजावी लागते ती या ‘रत्ना’ला मोजावी लागली असेल.

‘व्यक्त’ होण्याची प्रचंड आस असणा-या व त्यासाठी उपलब्ध प्रत्येक माध्यमाचा प्रयोगशील, सर्जनशील वापर करणाºया रत्नाकर मतकरींनी कुठलाही रोष, खंत, खेद किंवा ईर्षा न बाळगता ही किंमत मोजली़ त्यामुळे विजय तेंडुलकर यांचे समवयीन व प्रतिभेच्या बाबतीत तोडीस तोड कर्तृत्व असतानाही या ‘रत्ना’चे कार्य तसे तुलनेने झाकोळले गेले किंवा त्याला उशिराने न्याय मिळाला, असेच म्हणावे लागेल़ रत्नाकर मतकरींवर बसलेला गूढ कथाकार हा शिक्का किंवा त्यांची तशी निर्माण झालेली ओळखही त्यांच्या अष्टपैलूत्वाला झाकोळून टाकणारीच! कारण रत्नाकर मतकरी गूढकथांपुरते मर्यादित कधीच नव्हते़ उलट बालनाट्य ही त्यांची पहिली आवड होती व ते रुजवण्यासाठी, फुलवण्यासाठी केवळ लेखन करून न थांबता त्यांनी स्वत: नाट्यसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला व पदरमोड करून प्रयोगशीलतेचा ध्यास घेत प्रयोग करत बालनाट्य शाळांपर्यंतच नव्हे तर गरिबांच्या वस्त्यांपर्यंत, झोपडपट्टीपर्यंत रुजवले, फुलवले!

Read More  कोरोना व्हायरसमुळे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं निधन

‘अलबत्त्या गलबत्त्या’, ‘निम्माशिम्मा राक्षस’, ‘अचाट गावची अफाट मावशी’ यासारखी बालनाट्ये आज कित्येक वर्षांनंतरही बालकांना तेवढीच आनंदित करतात, लोकप्रिय ठरतात हे रत्नाकर मतकरींच्या अफाट व अचाट प्रतिभेचे बळच! खरे तर गूढकथांना साहित्यात कमअस्सल मानण्याच्या समीक्षकांच्या दृष्टिकोनाने अस्वस्थ होऊन रत्नाकर मतकरी या प्रांताकडे वळले ते बºयाच उशिराने! मात्र, त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने, प्रयोगशीलतेने साहित्याचे हे दालन अक्षरश: समृद्ध करून टाकले! त्यांना हे यशस्वीरीत्या जमले कारण त्यांनी लेखनाचे विविध प्रकार हाताळताना कधीही एका प्रकाराची दुसºया प्रकाराशी सरमिसळ न करण्याची शिस्त काटेकोरपणे पाळली़ त्या लेखन प्रकाराच्या मूलभूत तत्त्वांशी अत्यंत प्रामाणिक रहात त्यांनी त्यात प्रयोगशीलता व नावीन्याचा सतत ध्यास घेतला़ त्यामुळेच माध्यमांवर हा प्रांतही त्यांनी तेवढ्याच समर्थपणे यशस्वी करून दाखविला़ पु़ ल़ देशपांडे यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ सारख्या कथात्मक लेखनाचे रत्नाकर मतकरी यांनी केलेले नाट्यरूपांतर म्हणूनच पु़लं़च्या मूळ लेखनाशी एवढे तादात्म्य पावते की, ते दुसरे कोणी रूपांतरित केले आहे यावर विश्वास बसत नाही!

लेखन प्रकाराचे मूलतत्त्व व या प्रकाराची शैली यांच्याशी पूर्ण प्रामाणिकपणा ठेवण्याची शिस्त रत्नाकर मतकरी यांनी काटेकोरपणे बाळगली आणि त्यामुळेच लेखनाचे सर्व प्रकार हाताळतानाही ते त्यांना न्याय देत राहिले, प्रत्येक प्रकार यशस्वी करत राहिले, त्यात आपला स्वतंत्र ठसा उमटवत राहिले! लेखक, साहित्यिक, कलाकार, रंगकर्मी, चित्रकार म्हणून मागची सहा-साडेसहा दशके लीलया व यशस्वी संचार करत असतानाच सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते सामाजिक बांधीलकीही तेवढ्याच प्रामाणिकपणे व बेडरपणे पाळत राहिले़ नर्मदा बचाव आंदोलन असो की, निर्भय बनो आंदोलन त्यांनी परिणामांची पर्वा न करता बेडरपणे, प्रामाणिकपणे त्यात सक्रिय सहभाग नोंदविला़ त्यांनी शेवटपर्यंत आपले सामाजिक भान कसोशीने जपले व परखडपणे मते व्यक्त करताना कशाचीही तमा बाळगली नाही की, परिणामांची चिंताही केली नाही! असा या अष्टपैलू रत्नाचा मागच्या सहा-साडेसहा दशकांपासून अखंडपणे, खळाळत कोसळणारा सर्जनशीलतेचा, प्रतिभाशीलतेचा व प्रयोगशीलतेचा सातत्यपूर्ण, शिस्तशीर, नेमस्त व रसिकांना चिंब करून टाकणारा प्रपात त्यांच्याच गूढकथेप्रमाणे ‘कोरोना’चा गूढ धक्का देत अचानक थांबला! रसिकांना, चाहत्यांना, समिक्षकांना जबरदस्त धक्का देऊन गेला, हा ही वेदनादायी योगायोगच! या अष्टपैलू, सर्जनशील, प्रतिभासंपन्न, प्रयोगशील ‘रत्ना’ला ‘एकमत’ची आदरांजली़

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या