26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन; मराठी चित्रपटसृष्टीला धक्का

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन; मराठी चित्रपटसृष्टीला धक्का

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर- ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर हातकणंगले तालुक्यातील रुई या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. आशालता वाबगावकर यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी सरोज सुखटणकर यांचे निधन झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.

सरोज सुखटणकर यांनी मराठी चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका पार पाडल्या. सध्या सुरू असलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत त्यांनी अभिनय केला होता. नाटक, मालिका आणि विविध मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

सुखटकणर यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला ‘न्यू भारत नाट्य क्लब’ मधून सुरुवात झाली होती. तुझं आहे तुझपाशी, प्रेमा तुझा रंग कसा, मुंबईंची माणसं, दिवा जळू दे सारी रात यासह इतर नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला.

अलका कुबल यांच्यासोबत केलेला धनगरवाडा हा सरोज सुखटणकर यांचा अखेरचा चित्रपट ठरला. त्यांनी जोतिबाचा नवस, दे दणादण, बळी राजाचे राज्य येऊ दे यासह 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

2017-18 मध्ये सरोज सुखटणकर यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य सचालनालयाकडून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून सुखटणकर यांना 2006 मध्ये चित्रकर्मी पुरस्कार देण्यात आला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनयाबद्दल सुखटणकर यांना इतर संस्थांनी देखील पुरस्कार देऊन गौरवले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या