23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeकोरोना व्हायरसमुळे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं निधन

कोरोना व्हायरसमुळे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं रविवारी (17 मे) रात्री निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. चार दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, असं सांगितलं जात आहे. मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं.

नाटक, बालनाट्य, कथा गूढकथा, ललित लेखन असे वेगवेगळे साहित्यप्रकार रत्नाकर मतकरी यांनी हाताळले होते. मतकरी यांनी 70 नाटकं आणि 22 बालनाट्यं लिहिली.

‘आरण्यक’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘इंदिरा’ ही त्यांची काही गाजलेली नाटकं होती. ‘अलबत्या-गलबत्या’, ‘निम्मा-शिम्मा राक्षस’ यांसारखी बालनाट्यंही त्यांनी लिहिली होती.

रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘इन्व्हेस्टमेन्ट’या चित्रपटाला 2013 साली सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता.

गूढकथा हा साहित्यप्रकारही त्यांनी मराठीमध्ये रुजवला. ‘गहिरे पाणी’, ‘खेकडा’, ‘मध्यरात्रीचे पडघम’, ‘निजधाम’ हे त्यांचे गूढकथासंग्रह आहेत. त्यांच्या ‘गहिरे पाणी’ या कथासंग्रहावर आधारित मालिकाही गाजली होती.

गूढकथा आकृतीबंधाच्या या शक्यताच समीक्षकांच्या ध्यानात आल्या नाहीत. त्यामुळे गूढकथेचे महत्त्व मराठी साहित्याला समजलेच नाही, अशी खंतही रत्नाकर मतकरी यांनी व्यक्त केली होती. मानसशास्त्रीय दृष्टिकोन, मानवी संबंध, सामाजिक प्रश्न अशा वेगवेगळ्या पातळीवर गूढकथेच्या माध्यमातून आशय अभिव्यक्त करता येतो, असं रत्नाकर मतकरी यांचं मत होतं.

महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील अमुल्य साहित्य ‘रत्न’ निखळलं-मुख्यमंत्री


ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राच्या साहित्य विश्र्वातील अमुल्य असे एक साहित्य ‘रत्न’ निखळले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे, असं त्यांनी म्हटलंय. रत्नाकर मतकरी यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ आनंद दिला. आमच्या पिढीतल्या लहानांचे भाव विश्व साकारले, महाराष्ट्राचे साहित्य- नाट्य क्षेत्र समृद्ध केले. त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या