24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीय‘अग्निपथ’ योजनेवरून आंदोलनाला हिंसक वळण; ट्रेनची जाळपोळ

‘अग्निपथ’ योजनेवरून आंदोलनाला हिंसक वळण; ट्रेनची जाळपोळ

एकमत ऑनलाईन

छपरा : लष्करी सेवेसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. बुधवारी बिहारमध्ये या योजनेविरोधातील आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आज अनेक जिल्ह्यांत आंदोलनाचा वणवा पेटला आहे. आज हरियाणातील गुरुग्राममध्येही आंदोलन झाले. आंदोलक विद्यार्थी-युवकांनी गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केले आहे. तर, बिहारमधील आंदोलनाला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार भारतीय लष्करात चार वर्षांसाठी भरती केली जाणार आहे. त्यातील २५ टक्के जवानांना लष्करी सेवेत पुढील १५ वर्षांसाठी दाखल करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला मोठा विरोध सुरू झाला आहे.

बिहारमधील छपरा जिल्ह्यात आंदोलक विद्यार्थी-युवकांनी छपरा जंक्शनजवळ एका पॅसेंजर ट्रेनला आग लावल्याची घटना घडली. जहानाबाद आणि नवादामध्ये सैन्य भरतीसाठी तयारी करत असलेले विद्यार्थी रस्त्यावर उतरले. भारतीय लष्करातील कंत्राटी पद्धतीच्या नोकरीविरोधात नवादामधील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप असल्याचे दिसत आहे. नवादामधील प्रजातंत्र चौकात विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत गदारोळ केला.

सहरसामध्ये सैन्य भरतीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी रेल रोको आंदोलन केले. काहींनी राजधानी एक्स्प्रेसच्या कोचवर लाठीने हल्लादेखील केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आरा जिल्ह्यातही आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला. आरा रेल्वे स्थानकात आंदोलकांनी तोडफोड केली. या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. बेगूसरायमध्येही युवकांनी टायर जाळून केंद्र सरकारच्या या योजनेला विरोध दर्शवला आहे.

बिहारमधील आंदोलनाच्या वणव्याची धग हरियाणामध्येही जाणवू लागली आहे. गुरुग्राममध्ये विद्यार्थ्यांनी दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केला आहे. पलवलमध्येही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. बुधवारी बिहारमधील बक्सर, मुझफ्फरनगरसह काही ठिकाणी आंदोलने झाली होती. त्यानंतर आजही आंदोलन सुरू राहिले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या