बंगळुरू : विराट कोहलीने लागोपाठ दुस-या सामन्यात शतकाला गवसणी घातली. हैदराबादविरोधात विराट कोहलीने शतक झळकावले होते. आज मोक्याच्या क्षणी त्याने पुन्हा एकदा शतकी खेळी केली आहे. विराट कोहली याने पहिल्या चेंडूपासूनच वादळी फलंदाजी केली. प्रथम संयमी आणि त्यानंतर आक्रमक फलंदाजी करत शतकाला गवसणी घातली. विराट कोहलीने ६१ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने १३ चौकार आणि एक षटकार लगावला. विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर आरसीबीने १९७ धावांपर्यंत मजल मारली. याने १६६ च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये ७ शतके झळकावली आहेत. विराट कोहलीने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला आहे. युनिवर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर सहा शतकांची नोंद आहे तर जोस बटलर पाच शतकासह तिस-या क्रमांकावर आहे. मोक्याच्या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली. गुजरातविरोधात विराट कोहलीने शतकाला गवसणी घातली. त्याने यंदाच्या हंगामातील दुसरे शतक झळकावले तर आयपीएलच्या करिअरमधील विराट कोहलीचे सातवे शतक झळकावले.
यंदाच्या हंगामात कोहली तळपला
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विराट कोहलीच्या बॅटने धावांचा पाऊस पाडला. विराट कोहलीने १४ सामन्यात सहाशेपेक्षा जास्त धावा चोपल्या. यामध्ये दोन शतके आणि सहा अर्धशतकाचा समावेश आहे. ४५ ची सरासरी आणि १३६ च्या स्ट्राईक रेटने विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला. विराट कोहली ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत दुस-या क्रमांकावर आहे. या यादीत आरसीबीचा फाफ डु प्लेसिस पहिल्या क्रमांकावार आहे. डु प्लेसिसच्या नावावर ७०० पेक्षा जास्त धावा आहेत.