पंढरपूर : यंदाच्या माघी यात्रेच्या दरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे उत्पन्न चौपट वाढले असून देवाच्या चरणी तब्बल ४ कोटी ८८ लाख ६२ हजार २८ रुपयांचे भरभरून दान मिळाले आहे.
यामध्ये सोने, रोख देणगी पावती, हुंडी पेटीतील जमा रक्कम आणि भक्त निवास येथील उत्पन्नाचा समावेश आहे. या माघी काळात वसंत पंचमी दिवशी एका भाविकाने आपले नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर जवळपास पावणेदोन कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दान दिल्याने या उत्पन्नात फार मोठी वाढ झाली आहे.
यंदाच्या वर्षी माघीसाठी विक्रमी संख्येने वारकरी आले होते. सुमारे ५ लाख भाविकांनी श्रींचे पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतल्याची नोंद मंदिर समितीकडे झाली आहे. भाविक संख्या वाढल्याने मंदिर समितीच्या उत्पन्नात ही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यंदाची माघ शुद्ध जया एकादशी १ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली.
यात्रा कालावधीत २२ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात मंदिर समितीला प्राप्त झालेल्या उत्पन्नाची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा माघी यात्रा काळात मंदिर समितीचे उत्पन्न मागील वर्षी झालेल्या माघी यात्रेच्या तुलनेत जवळपास चौपट झाले आहे.