मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी २०१८ मध्ये दिवाण हौसिंग फायनान्स (डीएचएफएल) मध्ये हजारो कोटींचा गैरव्यवहार केला आहे. सध्या राणा कपूर आणि डीएचएफएलचे वाधवान बंधू तुरुंगात आहेत. त्यांची स्थावर मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ज्यात या कपूर आणि वाधवान यांची मुंबई, लंडन, न्यूयॉर्कमधील प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईत ईडीने वाधवान कुटुंबियांची ३४४ बँक खाती जप्त केली. एखाद्या कुटुंबाकडे इतकी बँक खाती अलिकडच्या काळातील हे पहिलेच उदाहरण आहे. ही बँक खाते मोजता-मोजता अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी हैराण झाले.
ईडीने केलेल्या कारवाईत राणा कपूर आणि कपील वाधवान आणि धीरज वाधवान यांची २२०३ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेचे बाजार मूल्य २८०० कोटी आहे. राणा कपूर यांचा मुंबईतील फ्लॅट आणि दिल्लीतील बंगला ईडीने जप्त केला आहे. या प्रॉपर्टीची किंमत ७९२ कोटी आहे. त्यापैकी दिल्लीत ल्युटेन्स झोनवर १.२ एकरात पसरलेल्या आलिशान बंगल्याची किंमत ६८५ कोटी रुपये आहे. याशिवाय ईडीने राणा कपूर यांच्या मालकीचे न्यूयॉर्क आणि लंडनमधील फ्लॅट्ससुद्धा जप्त केले आहेत. तसेच मुंबईतील कपूर यांची स्थावर मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.
येस बँक आणि दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) या प्रकरणात नुकतेच सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. येस बँकेने दिलेल्या कर्जाऊ रकमेचा गैरवापर करतानाच डीएचएफएलने हे कर्ज बुडवले. याबद्दल येस बँकेचे संस्थापक राणा कपूर व डीएचएफएलचे प्रवर्तक बंधू कपिल व धीरज वाधवान यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
एका कुटुंबाकडे साडेतीनशे खाते असल्याचे पहिलेच उदाहरण
इडीने केलेल्या कारवाईत ईडीला वाधवान कुटुंबियांची ३४४ बँक खाती जप्त करण्यात आली आहेत. वाधवान यांची फायनान्स कंपनी होती. मात्र एका कुटुंबाकडे इतकी बँक खाती असल्याचे अलिकडच्या काळातील पहिल्यांदाच समोर आले आहे. ही ३४४ खाती कोणत्या बँकेत आहेत, याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. त्यामुळे या खात्यांतील रक्कमही जप्त होऊ शकते.
राणा कपूरची मुंबईत होती कोट्यवधींची प्रॉपर्टी
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची दक्षिण मुंबईतील कंबाला हिल या आलिशान एरियात खुर्शीदबाद ही निवासी इमारत आहे. त्याशिवाय नेपियन सी रोडवर एक डुप्लेक्स फ्लॅट आहे. वरळीतील स्कायस्क्रॅपर या टॉवरमध्ये ८ फ्लॅट आहेत. नरिमन पॉर्इंट येथे एनसीपीएमध्ये एक फ्लॅट मालकीचा आहे, असे ईडीने म्हटले आहे.
वाधवान बंधूंची १४११ कोटींची मालमत्ता जप्त
याच कारवाईत ईडीने डीएचएफएलचे संचालक कपील वाधवान आणि धीरज वाधवान यांची १४११.९ कोटींची मालमत्ता जप्त केली. ज्यात खार येथील वाधवान कुटुंबियांचे १२ फ्लॅट्स जप्त करण्यात आले आहे. तसेच न्यूयॉर्क आणि लंडनमधील फ्लॅट्स आॅस्ट्रेलियातील कमर्शिअल प्रॉपर्टी आणि पुण्यातील वाधवान कुटुंबियांच्या मालकीच्या जमिनीवर टाच आणली आहे.
Read More जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच: रूग्ण संख्या ५५८ वर पोहचली