महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट देऊन मैदानाची पहाणी केली
मुंबई : क्वारंटाईन सेंटर उभारण्यासाठी वानखेडे स्टेडियम ताब्यात घेतले जाणार असल्याचे वृत्त चुकीचे असल्याची माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. मुंबईतील कोणतेच मैदान ताब्यात घेतले जाणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे महापौर किशोरी पेडणेकर यांनी वानखेडे स्टेडियमला भेट देत मैदानाची पाहणी केली होती. सोबतच वानखेडे परिसरातील नागरिकांनी मैदानात क्वारंटाईन सेंटर उभारण्यास विरोध केला होता. त्यानंतर आता महापालिका आयुक्तांनी असा कोणताही विचार नसल्याचे सांगितले आहे.
Read More JIOचा करार : General Atlantic करणार 6,598.38 कोटींची गुंतवणूक
इक्बाल सिंग चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘‘वानखेडे ताब्यात घेतले जाणार असल्याच्या बातम्या पाहून मला आश्चर्य वाटले. जर खुली मैदाने घेतली आणि पाऊस पडला तर चिखल होईल. चिखल झाल्यानंतर खूप अडचणी निर्माण होतील. आपल्याकडे मोठे पार्किंग आहेत ते वापरू शकतो. मैदानात इतके मोठे मंडप उभारू शकत नाही. त्यामुळे असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोणतेही मैदान ताब्यात घेतले जाणार नाही’’. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वानखेडे स्टेडियमसोबत ब्रेबॉर्न स्टेडियमदेखील ताब्यात घेतले जावे अशी मागणी ट्विटरवरून केली होती. त्यांच्या या मागणीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताना हे शक्य नसल्याचे सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मागणीला विरोध करत ट्विटरवरून उत्तर देताना सांगितले की, ‘‘आपण स्टेडियम किंवा खेळाची मैदाने ताब्यात घेऊ शकत नाही. मातीची मैदानं असल्याने तिथे पावसाळ्यात चिखल होऊ शकतो. क्वारंटाईनसाठी टणक पृष्ठभूमीची गरज असून त्यावर व्यवस्था करता येईल आणि तशी करत आहोत’’. यामुळे मैदाने ताब्यात घेतली जाणार नाहीत हे स्पष्ट झाले
आहे.