पंढरपूर : पंढरपूरमध्ये जेवणातून वारक-यांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. जेवणामध्ये बासुंदी, पत्ता कोबी, बेसन आणि चपातीचा आस्वाद घेतल्यानंतर संध्याकाळी वारक-यांना उलटी, पोटदुखी, जुलाब असा त्रास होऊ लागला. त्यामुळे जवळपास ३० ते ३२ जणांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
यामधील १० ते १५ जणांना रात्री अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अरविंद गिराम यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील श्री विठ्ठल आश्रम ६५ एकर जवळील मठामध्ये दुपारी जेवण झाल्यावर अचानक वारक-यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना ताबोडतोब उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं. जेवणात बासुंदी, पत्ताकोबी, बेसन, खाल्ल्याचे रूग्णांकडून सांगण्यात आलं. रुग्णांमध्ये बालकांसह ३० ते ३५ वयोगटातील वारक-यांचा समावेश आहे.