22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रबोच-या थंडीमुळे विठुरायाला ऊबदार पोशाख

बोच-या थंडीमुळे विठुरायाला ऊबदार पोशाख

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : सध्या राज्यभर थंडीचा कडाका वाढत असून ऋतुमानानुसार विठुरायाला ऊबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात झाली आहे. कार्तिकी यात्रेच्या प्रक्षाल पूजेनंतर दुस-या दिवशीपासून दरवर्षी देवाला ऊबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात होते. यामध्ये ऊब देण्यासाठी देवाला मऊ काश्मिरी शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

रात्री शेजारतीनंतर विठुराया जेव्हा निद्रेसाठी जात असतो तेव्हा त्याच्या अंगावरील पोशाख काढण्यात येतो. देवाचे अंग पुसून घेतल्यावर देवाच्या डोक्यावरील मुकुट काढून तेथे १५० हात लांबीचे हे खास ऊबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधण्यात येते. यानंतर देवाच्या कानाला थंडी वाजू नये म्हणून मस्तकी असलेल्या मुकुटावर सुती उपरण्याची पानपट्टी देवाच्या कानाला बांधण्यात येते. यावर पारंपरिक असलेली देवाची ऊबदार काश्मिरी शाल अंगावर घालण्यात येते. या कपड्यांमुळे देवाला नखशिखांत ऊबदारपणा जाणवेल याची खबरदारी घेतली जाते . यानंतर देवाला तुळशीहार व फुलांचे हार घातले जातात. आरती करीत देवाला निद्रेसाठी सज्ज केले जाते .

पहाटे काकड्याच्यावेळी देवाच्या अंगावरील ही काश्मिरी रजई फक्त काढून बाकीचे ऊबदार कपडे तसेच ठेवण्यात येतात. रुक्मिणी मातेलाही अशाच पद्धतीने ऊबदार रजई गुंडाळून ठेवण्यात येते. साधारणपणे प्रक्षाळपूजेच्या दुस-या दिवसापासून देवाची हुडहुडी घालविण्यासाठी हा खास पद्धतीचा पोशाख देवाला घालण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून साधारण होळीपर्यंत हे ऊबदार कपडे देवाला घालण्यात येतात.

परभणीत यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी तापमानाची नोंद
यंदा परभणी जिल्ह्यात थंडी पडण्यास डिसेंबरचा तिसरा आठवडा उजडला आहे. जिल्ह्यात आज १०.०७ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली असून सर्वत्र थंडीला सुरुवात झाली आहे. या थंडीमुळे सकाळी व्यायाम, मॉर्निंग वॉक करणा-यांची संख्या वाढली असून ऊबदार कपड्यांचा वापरही केला जात आहे. एकूणच यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी तापमानाची नोंद आज झाली आहे. त्यामुळे येते काही दिवस हे तापमान असेच कमी राहण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे परभणीकरांना थंडीचा सामना करावा लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या