मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरील उमेदवारीसाठी सध्या संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेनेकडून परस्परांविरोधात प्रेशर टॅक्टिक्स वापरल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपती घराण्याचा मान राखतील, असा विश्वास आहे, हे वक्तव्य करून संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात ढकलला होता. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही तितक्याच तत्परतेने प्रत्युत्तर दिले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांना संभाजीराजे छत्रपती यांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, आम्ही नक्कीच छत्रपती घराण्याचा मान राखू. त्यामुळेच आम्ही संभाजीराजे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता. सध्यातरी यावर मी एवढंच बोलू शकेन. पण राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असेल, ही भूमिका संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.
संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पाठिंबा हवा असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातली आहे. त्यासाठी संभाजीराजे यांना सोमवारी दुपारी १२ वाजता ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधण्यासाठी या, असेही सांगण्यात आले होते. मात्र, संभाजीराजे छत्रपती हा प्रस्ताव नाकारून मुंबईतून कोल्हापूरला निघून आले होते.
दरम्यान, संभाजीराजे यांच्या आजच्या वक्तव्यानंतर संभ्रम आणखीनच वाढला आहे. संभाजीराजे यांनी आपण शिवसेनेत प्रवेश करणार की नाही, याबाबत कोणतेही ठोस भाष्य केलेले नाही. संभाजीराजेंच्या एकूण वक्तव्याचा सूर पाहता त्यांनी राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात ढकलल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, अशी आशा व्यक्त करून संभाजीराजे यांनी एकप्रकारे शिवसेनेवर पाठिंब्यासाठी दबाव आणल्याची चर्चा आहे.