मुंबई : ‘जे बिकाऊ होते ते गेले. त्यांची परवा करण्याची आम्हाला गरज नाही…’ असे म्हणत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
मागील १५ दिवसांच्या अनेक धक्कादायक घडामोडींनंतर राज्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सत्तांतर घडवून आणत सरकार स्थापन केले. या सर्व घडामोडींसंदर्भात विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. विनायक राऊत सध्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला.
निवडून आलेले आमदार जरी भाजपच्या दुकानामध्ये विकले गेले असले तरी जो शिवसैनिक आहे तो आज तेवढ्याच ताकदीने उद्धव ठाकरेंसोबत राहिला आहे. इतकेच नव्हे तर जे जुने क्रांती मंडळी आहे ते पुन्हा सक्रिय झाले आहे, असे सांगत जे शिवसेनेपासून दूर गेले होते ते पुन्हा सामिल होतील असा विश्वास विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
ज्यांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही शिवसैनिक पुन्हा उभे राहिलो आहोत. अशी संकटं भरपूर वेळा पचवलेली आहेत. त्यामुळे जे गेले ते गेले. जे बिकाऊ होते ते गेले. त्यांची पर्वा करण्याची आम्हाला गरज नाही, अशा शब्दांत राऊत यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला.