25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमेमनच्या भावासोबतच्या बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या? ; भाजपची शिवसेनेवर टीका

मेमनच्या भावासोबतच्या बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या? ; भाजपची शिवसेनेवर टीका

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनचा चुलत भाऊ रऊफ मेमनसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर बोलत असल्याचा व्हीडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्या बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याकूब मेमनची कबर सजवल्या प्रकरणी राजकारणात एकमेकांवर हल्लाबोल करण्यात येत होते, अशातच हा व्हीडीओ समोर आल्यामुळे पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे.

सध्या याकूब मेमनच्या कबरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी मरिन लाइन्स येथील बडा कब्रस्तानमध्ये याकूब मेमनच्या कबरीवर लायटिंग केल्याबद्दल आणि संगमरवरी फरशी बसविण्यात आल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षांकडून हल्लाबोल करण्यात आला होता.

त्यावर किशोरी पेडणेकर प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडी सरकारचा यात कोणताही संबंध नाही म्हणाल्या होत्या. मात्र आता किशोरी पेडणेकरच याकूबचा भाऊ रऊफसह एका बैठकीत बसलेल्या दिसत असल्यामुळे किशोरी पेडणेकरांवर आरोप केले जात आहेत. त्यामुळे शिवसेनेचा त्या कबरीच्या सुशोभीकरणात सहभाग होता का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

याबाबत चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे. कबर विकत घेण्यासंबंधी याकूबचा मोठा भाऊ टायगर याने धमकीचे पत्र बडा कब्रस्तान ट्रस्टला देण्यात आले होते, असाही आरोप करण्यात आला आहे. तसेच रऊफ मेमनचा जागेचे व्यवहार करण्यात मध्यस्थी असल्याचा आरोपही केला जातो आहे.

यावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, धार्मिक स्थळांच्या तक्रारी ऐकण्यासाठी मी तिथे गेले होते. चर्चा करताना अनेक लोक तिथे होते. त्यामुळे गुन्हेगारांशी संबंध असण्याचा प्रश्नच नाही. बैठकीत कोण उपस्थित होते मला माहिती नाही. मी जैन मंदिरात गेले, गुरुद्वाराला गेले, सर्व ठिकाणी गेले. वेगवेगळ्या कारणांसाठी मी जाते. जातपात न बघता कामासाठी मी जात होते.

तिथे अनेक लोक होते. ते कोण आहेत मला माहीत नाही. भाजप वेगवेगळ्या गोष्टींची लिंक लावून फोटो व्हायरल करतो. मी कधीच कोणाला तुम्ही कोण असे विचारत नाही. जातिभेद करत नाही. मी कामाच्या ठिकाणी जाऊन फक्त कामंच केली. शिवसेनेच्या नेत्यांवर भाजपकडून आरोप केले जात आहेत असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत.
हे राजकारण आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आरोप केले जात आहेत. आम्ही आमच्या कामाने उत्तर देऊ, असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या