हिंगोली/प्रतिनिधी
जिल्ह्यात एक दिवस आड दुकाने उघडण्यास मुभा असली तरी खरेदीसाठी पायीच यावे असे आदेश स्पष्ट आदेश आहेत़ मात्र हिंगोलीकरांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून बाजारात वाहनाच्या वापराची जणू चढाओढ सुरु आहे. परिणामी पोलीस देखील हतबल झाले आहेत. काही कारण नसतांनाही नागरीक वाहने रस्त्यावर आणत असल्याने पोलिसांनी कारवाई करत १२५ वाहने जप्त करुन दंड वसूल केला़ यादरम्यान सोशल डिस्टन्सीगचे भान कुणालाच राहिले नसल्याचे चित्र दिसून आले.
जिल्ह्यात लॉकडाऊन नावात मात्र गर्दी सर्वच गावात असे चित्र आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर गर्दी दिसून आली. बस स्थानक परिसर, इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, जवाहर रोड, पोस्ट आॅफीस रोड भागात मोठी गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे वाहने बाजारपेठेत आणू नयेत, अशा सूचना पोलीस प्रशासनाकडून वारंवार केल्या जात असतानाही रस्त्यावर उतरलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे जवाहर रोड भागात पादचा-यांनाही ये-जा करणे अवघड झाले होते. वाढत्या गर्दीत कोरोना रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना पायदळी तुडविल्या जात होत्या.
Read More लॉकडाऊनमध्ये भांडी विक्री करणा-यावर गुन्हा दाखल
शहरात बहुतेक नागरिक खरेदीसाठी खासगी वाहने घेऊन आले होते. त्यांची वाहने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. आय. सय्यद यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. जवळपास शेकडो वाहने पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. यात इतर कामानिमित्त आलेल्या नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच मुख्य म्हणजे गेल्या पन्नास दिवसांपासून तळीरामांचा कोरडा असलेला घसा आज ओला होत होता. मात्र, परवानगी असलेल्या विक्रेत्यांनी खरेदीदाराची थर्मल तपासणी करणे, सॅनिटायझर वापर यानंतरच ग्राहकाला दारू देण्याची परवानगी देण्यात आली होती. सकाळी दुकानांसमोर गर्दी नव्हती. मात्र, हळूहळू गर्दी वाढल्याने ग्राहकांची लांबलचक रांग लागल्याचे दिसून आले.
दरम्यान, बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती़ अनेकांनी सोशल डिस्टन्स पाळले नसल्याचे आढळून आले़