मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही, त्यांनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवे होते,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी एका मुलाखतीत अदानी प्रकरणात जेपीसी, पहाटेचा शपथविधी, फडतूस-काडतूसवरून रंगलेले राजकारण यासह विविध मुद्यांवर भाष्य केले. सोबतच राजकीय नेत्यांना सल्ला देताना त्यांचे कानही टोचले.
शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्रिपद तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन संख्येवरून तयार झाली होती. यामध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. त्या संबंधित दुसरा निर्णय जर कोणी घेत असेल, राजीनामा देत असेल, त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांसोबत संभाषण ठेवण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही
दरम्यान अदानी प्रकरणात जेपीसीसंदर्भात शरद पवार यांचे सूर बदलल्याचे दिसत आहेत. सहका-यांना जेपीसी आवश्यक वाटत असेल तर विरोध करणार नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. मित्राचे मत माझ्यापेक्षा वेगळे आहे. पण आम्हाला यात ऐक्य ठेवायचे आहे. माझे मत मी मांडले. पण सहका-यांना वाटत असेल की जेपीसी पाहिजे, तर मी त्याला विरोध करणार नाही. त्यांच्या मताशी सहमत नाही पण विरोधकांच्या एकीवर दुष्परिणाम होऊ देणार नाही. याबाबतीत आम्ही आग्रह धरणार नाही.
फडतूस-काडतूसवर टोचले कान
राज्यात फडतूस शब्दावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार सामना पाहायला मिळाला. परंतु फडतूस आणि काडतूस शब्दावरून शरद पवार यांनी सर्वच नेत्यांचे कान टोचले. वैयक्तिक टीकाटिप्पणी करू नका, असे खडे बोल शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना सुनावले. ‘मला जो महाराष्ट्र माहीत आहे, जी संस्कृती माहीत आहे, जनतेची मानसिकता माहीत आहे, अशा गोष्टी शक्यतो टाळा. वैयक्तिक हल्ला नको, राजकीय विषय घ्या, लोकांचे विषय घ्या, त्यावर आक्रमक व्हा, परंतु वैयक्तिक हल्ला, चिखलफेक ही स्थिती येता कामा नये. हे टाळण्याचे काम जाणीवपूर्वक केले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.