मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोप, गौप्यस्फोट यांच्या मालिकेनंतर आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. अशातच याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी नवी मागणी केली आहे.
गोटे यांच्यामते गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमधील खोल्यांसाठी सात दिवसांचे दर ५६ लाख आहेत. यामध्ये एका दिवसाचं जेवण आणि इतर सेवांचा खर्च सुमारे ८ लाख रुपये आहे.मग आमदारांचा इतका खर्च कोण करत आहे यावर ईडीने चौकशी करावी यासाठी गोटे उद्या ईडी कार्यालयात जाणार आहेत.
२१जूनपासून आसाममधील गुवाहाटीत वास्तव्याला असलेल्या आमदारांच्या खर्चाची ईडी चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केली आहे. राज्याचे गृह सचिव, मुख्य सचिव आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्याकडे ही मागणी केल्याचं अनिल गोटेंनी सांगितलं आहे. तसेच उद्या थेट मुंबईतील ईडी कार्यालयात जाऊन याची विचारणा करणार असल्याचंही अनिल गोटे यांनी सांगितलं आहे.
हॉटेलमधील सूत्रांनी आणि स्थानिक नेत्यांच्या मते, गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमधील खोल्यांसाठी सात दिवसांचे दर ५६ लाख आहेत. यामध्ये एका दिवसाचं जेवण आणि इतर सेवांचा खर्च सुमारे ८ लाख रुपये आहे. या हॉटेलमध्ये १९६ खोल्या आहेत. आमदार आणि त्यांच्या टीमसाठी बुक केलेल्या ७० खोल्यांव्यतिरिक्त, व्यवस्थापन नवीन बुकिंग स्वीकारत नाही. आता फक्त तेच लोक हॉटेलमध्ये येऊ शकतात ज्यांचे बुकिंग आधीच झाले होते. याशिवाय मेजवानी बंद आहे. गुवाहाटीतील एक पंचतारांकित हॉटेल सध्या देशभर चर्चेचा विषय आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार या हॉटेलमध्ये राहिले आहेत.
दिवसाला इतका खर्च
राज्यातील शिवसेनेत उभी फुट पाडून एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार सध्या आसाममधील गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहेत. या हॉटेलमधील ७० खोल्या या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. बंडखोरांच्या या लवाजम्यासाठी दिवसाला ८ लाखांचा खर्च तर सात दिवसांचा खर्च हा ५६लाख रुपये इतका असल्याचं एका वृत्तामध्ये सांगितलं आहे.